चीनच्या विद्यापीठामध्ये प्रवेश परीक्षा देणार यंत्रमानव

robot
बीजिंग : कृत्रिम बुद्धिमत्ता यंत्रमानवाला प्रदान करता येते याला काही मर्यादा असल्या तरी विविध क्षेत्रांत त्यांचा वापर वाढत आहे. चीनमध्ये यंत्रमानवाला राष्ट्रीय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांबरोबर बसवले जाणार आहे. विद्यापीठ प्रवेशासाठी घेतल्या जाणा-या या प्रवेश परीक्षेस बसण्याची संधी त्याला पुढील वर्षी दिली जाणार असून, त्यात तो चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईल अशी आशा आहे.

गणित, चिनी भाषा, मुक्त कलांची सर्वंकष चाचणी अशा तीन परीक्षा विशिष्ट पद्धतीने तयार केलेला हा यंत्रमानव देणार असून त्यात इतिहास, राज्यशास्त्र व भूगोल हे विषय असणार आहेत, असे चेंगडू येथील कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लिन हुई यांनी म्हटले आहे. यंत्रमानवाला इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच ठराविक वेळेत उत्तरे लिहून पूर्ण करावी लागणार आहेत, बंद खोलीत परीक्षा घेतली जाणार असून, त्या वेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व नोटरी यांची उपस्थिती राहील. यंत्रमानव एका प्रिंटरला जोडलेला असेल, त्याला इलेक्ट्रॉनिक पद्धतीची प्रश्नपत्रिका दिली जाईल. अर्थात, ती इतर मुलांना मिळेल तेव्हाच त्यालाही लोड केली जाणार आहे. यंत्रमानवाचा इंटरनेटशी काही संबंध असणार नाही, त्यामुळे कॉपी करण्याचा प्रश्न राहणार नाही. हा यंत्रमानव त्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आज्ञावलीच्या मदतीने प्रश्नांची उत्तरे देईल असे ‘चायना डेली’ ने म्हटले आहे.

चिनी व कला शाखेच्या चाचण्या गणितापेक्षा यंत्रमानवास अवघड जातील, कारण गणितात वस्तुनिष्ठ व विशिष्ट उत्तरे असलेले प्रश्न असतात, इतर विषयांत वर्णनात्मक उत्तरे अपेक्षित असून, वाचन व आकलन त्यासाठी गरजेचे आहे. लिन यांच्या मते त्याला निबंध लिहिणेही अवघड जाऊ शकते, पण यंत्रमानवाला आता लिहिण्याची कला शिकवली आहे. यंत्रमानव लिहिण्याच्या कलेत जास्त विश्लेषणात्मकता आणू शकतो. निबंध हा भावनेशी निगडित प्रश्न असून तो यंत्रमानव जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकणार नाही, कारण त्यात भावनांचा ओलावा, भाषेचा जिवंतपणा नसेल. परीक्षा देणा-या या यंत्रमानवात भाषा व तर्कसंगत विचार करण्याची क्षमता राहील, असे संशोधन विभागाचे प्रमुख फू हाँगगाँग यांनी सांगितले. यात गणित चाचणीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.

Leave a Comment