काळा पैसा लपविण्याचे केंद्र बनले आहे न्यूझीलंड

panama-leaks
पनामा – न्यूझीलंडमध्ये कर चुकवून काळा पैसा लपवून ठेवण्यासाठी स्थापन झालेल्या खोट्या कंपन्यांची संख्या भरपूर आहे म्हणजेच न्यूझीलंड हे काळा पैसा लपविण्याचे मुख्य केंद्र झाले असल्याचा दावा पनामा पेपर्सच्या आधारे तयार केलेल्या अहवालात करण्यात आला आहे. गुंतवणूक करण्यासाठी जगभरातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी आणि विशेषतः लॅटिन अमेरिकेतील श्रीमंतांनी न्यूझीलंडची निवड केल्याची यात म्हटले आहे.

पनामा या देशातील ‘मोझॅक फोन्सेका’ या कायदेविषयक कंपनीशी संबंधित एक कोटींपेक्षा अधिक गुप्त कागदपत्रे काही दिवसांपुर्वी उघड झाल्यानंतर जगभरात खळबळ माजली आहे. त्यापैकी न्यूझीलंडसंबंधीच्या ६१,००० कागदपत्रांचे विश्लेषण तेथील स्थानिक माध्यमांनी केले आहे. परदेशी कंपन्यांसाठीचे करमुक्त धोरण, उच्च स्तरावर राखण्यात येणारी गुप्तता आणि कायदेशीर सुरक्षा इत्यादी कारणांमुळे मोसेक फॉन्सेस्काने अनेकांना न्यूझीलंडमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यास सुरुवात केली, असे तेथील माध्यमांचे मत आहे.

याव्यतिरिक्त कंपन्यांना रॉबर्ट थॉमसन या उद्योजकाने मदत केल्याचे या अहवालात म्हटले आहे. पनामा पेपर्समध्ये अनेक ठिकाणी त्याचा उल्लेख आहे. परंतू न्यूझीलंडमधील सर्वच कंपन्या खोट्या असल्याचा आरोप निराधार असल्याचे सांगत त्याने हा आरोप नाकारला आहे. न्यूझीलंड सरकारने गेल्या महिन्यात आपल्या परदेशी कंपन्यांसंबधीचा करप्रणालीचा पुनर्आढावा घेणार असल्याचे सांगितले होते. मोसेक फॉन्सेस्काचे दस्ताऐवज खुले झाल्यानंतर जगभरातील सरकारांनी करबुडव्यांविरोधात कडक पवित्रा घेतला आहे.

Leave a Comment