याच महिन्यात लॉन्च होणार ‘मोटो जी जेन ४’ ?

moto
नवी दिल्ली : याच महिन्यात बहुप्रतीक्षित मोटो जी (जेन ४) स्मार्टफोनचे लॉन्चिंग होण्याची शक्यता असून हा स्मार्टफोन येत्या १७ मे रोजी भारतात लॉन्च होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. मात्र, भारतात हा स्मार्टफोन येत्या १७ मे रोजी लॉन्च होणार असल्याची चर्चा आहे.

मोटोच्या भारतातील ट्विटर हँडलवरुन एक टीझर इमेजही रिलीज केले आहे. यामध्ये #Missing हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. या टीझर इमेजच्या माध्यमातून कथित मोटो जी ४ स्मार्टफोनच्या फीचर्सचा खुलासा करण्यात आला आहे. टीझरच्या माध्यमातून यूजर्सच्या समस्यांचाही उल्लेख करण्यात आला असून, त्यावर उपाय म्हणजे ‘मोटो जी ४’ असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

व्हिडीओ गेम खेळताना हँडसेट हँग होणे किंवा स्मार्टफोनची बॅटरी अचानक कमी होणे, यांसारख्या समस्यांवर मोटो जी ४ हा स्मार्टफोन उपाय असल्याचे सांगितले आहे. मात्र, स्मार्टफोनचे अधिकृत फीचर्स अद्याप जाहीर करण्यात आले नाहीत. दरम्यान, २८ एप्रिललाच मोटोच्या भारतीय विभागाने १७ मे रोजी होणाऱ्या मीडिया इव्हेंटची निमंत्रणे द्यायलाही सुरुवात केली आहे. निमंत्रण पत्रिकेवर इव्हेंटची तारिख सोडून इतर कोणत्याही गोष्टीचा उल्लेख नाही. ‘मोटी जी ३’प्रमाणेच ‘मोटी जी ४’ही सर्वात आधी भारतात लॉन्च केला जाईल, असे म्हटले जात आहे.

Leave a Comment