अदानींने थकवले ७२ हजार कोटी !

narendra-modi
नवी दिल्ली : राज्यसभा सदस्य पवन वर्मा यांनी उद्योजक घराण्यांवर थकित असलेल्या रकमेचा मुद्दा उपस्थित करीत केवळ अदानी ग्रुपकडे तब्बल ७२ हजार कोटी रुपये थकित असल्याचे म्हटले. एवढेच नव्हे, तर या कंपनीला मोदी सरकारकडून कल्पनेच्या बाहेरची मदत मिळत असून या मुद्यावरून वर्मा यांनी सरकारसमोरच प्रश्न उपस्थित केला.

यासोबतच जी मंडळी कर्ज फेडण्यास सक्षम नाहीत किंवा कर्ज फेडण्यास टाळाटाळ करतात, अशा लोकांनाच कर्ज देण्याबाबत सरकार सरकारी बँकांवर दबाव टाकत असते, असेही वर्मा म्हणाले. राज्यसभेत शून्य प्रहरात त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. सरकारी बँकांचे तब्बल ५ लाख कोटी रुपये थकित आहेत. यातील १.४ लाख कोटींचे कर्ज केवळ पाच कंपन्यांवर आहे. त्यामध्ये लेको, जीविके, सुजलोन एनर्जी, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी आणि अदानी ग्रुप व अदानी पॉवर्स कंपनीचा समावेश आहे. केवळ अदानी ग्रुपवर तब्बल ७२ हजार कोटींचे कर्ज थकित आहे. विशेष म्हणजे शेतक-यांवरदेखील ७२ हजार कोटी रुपयांचेच कर्ज आहे. मात्र, शेतक-यांच्या थकित कर्जाचा बाऊ केला जातो, असेही वर्मा म्हणाले.

मोदी सरकारचा अदानी घराण्याशी काय संबंध आहे, मला माहित नाही किंवा आपण त्यांना ओळखतही नाही. परंतु पंतप्रधान मोदी जिथे जातात, तिथे अदानी ग्रुपचे मालक गौतम अदानी असतात. विदेशी दौ-यात तर ते सोबतच असतात. मग तो चीन, ब्रिटन, अमेरिका, युरोप असो की, जपान, या प्रत्येक देशात अदानी पंतप्रधानांसोबत जाऊन आले आहेत. त्यामुळे त्यांना मोदी सरकारने केलेली मदत अकल्पनीय आहे. हा काही आरोप नाही, तर हे वास्तव असल्याचेही वर्मा यांनी सांगितले.

Leave a Comment