अशगाबात- जगातले संगमरवरी शहर

turkmeni
तुर्कमेनिस्तानची राजधानी अशगाबात हे शहर जगातली मार्बल सिटी म्हणून प्रसिद्धीस आले असून या शहरात ५०० हून अधिक एकापेक्षा एक सुंदर अशा पांढर्‍या संगमरवरातील इमारती आहेत. सफेत भिंती आणि सोनेरी घुमट अशी त्यांची खासियत आहे. भारतातील पांढर्‍या संगमरवरातील ताजमहाल ही जगप्रसिद्ध वास्तू असली तरी अशगाबातने पांढर्‍या संगमरवरी इमारतींसाठी जगात आपले नांव आघाडीवर ठेवले आहे.

अशगाबात मधील या इमारती बांधण्यासाठी ४५ लाख चौरस मीटर संगमरवराचा वापर केला गेला आहे. पांढर्‍या संगमरवरातील ५४३ इमारती या शहरात आहेत व त्यासाठी त्याचे नांव २०१३ च्या गिनीज बुकमध्ये नोंदले गेले आहे. ताजमहालाची आठवण करून देणारी कीपचेक मशीद ही येथील सर्वात सुंदर व प्रसिद्ध इमारत मानली जाते.तिच्या बांधकामासाठी ८६४ कोटी रूपये खर्च कले गेले आहेत व येथे एकावेळी २० हजार लोक नमाज अदा करू शकतात. जगातील १० सुंदर मशीदींपैकी एक अशी तिची ओळख आहे.

रशियापासून तुर्कमेनिस्तान अलग झाल्यानंतर सपरमुरात नियाजोव हे पहिले राष्ट्रपती बनले. त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलले तुर्कमेन नॅच्युरलिटी पार्क असेच भव्य आणि सुंदर आहे. तीन खांबावर उभारलेल्या या स्मारकात टॉपवर राष्ट्रपतींची सोनेरी मूर्ती विराजमान आहे. विशेष म्हणजे सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो तशी ही मूर्तीही फिरते. प्रसिडेन्शियल पॅलेस, म्युझियम, स्वातंत्र्य स्मारक अशा बर्‍याचशा सरकारी इमारती व राजकीय मॉन्युमेंट संगमरवरात बनविली गेली आहेत. येथील रेल्वे स्टेशनही पूर्ण संगमरवरात बांधले गेले आहे.

Leave a Comment