महिला स्वावलंबनाचा आदर्श

women
भारतातल्या महिलांना दुय्यम स्थान दिले जाते आणि त्यांना कनिष्ठतेची वागणूक दिली जाते. त्यामुळे त्या मागे पडलेल्या आहेत. त्या केवळ चूल आणि मूल या क्षेत्राशीच अडकून पडलेल्य आहेत, असे वारंवार सांगितले जाते. विशेषतः महिलांची ही खस्ता हालत हिंदी भाषिक पट्ट्यात फारच आहे असे म्हटले जाते. राजस्थानातील महिलांना तर घुंघट घ्यावा लागतो आणि त्या घराच्या बाहेर पडू शकत नाहीत असे सांगितले जाते. परंतु संजीव नय्यर या पत्रकाराने भारतातील महिलांच्या अवस्थेचा अभ्यास करताना राजस्थानपासूनच सुरूवात केली आणि राजस्थानातील बारमेर जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बारमेरपासूनच्या ३० किलोमीटरच्या अंतरावरील एका खेड्याला भेट दिली. तेव्हा तिथे त्याला वेगळेच दृश्य बघायला मिळाले.

तिथे एका झोपडीमध्ये २० राजस्थानी महिला काही उद्योग करण्यासाठी एकत्र आल्या होत्या. त्या सर्वांनी घुंघट घेतलेला होता. त्यामुळे त्या कर्तबगार नसतील आणि पुरुष वर्चस्वाच्या बळी ठरल्या असतील असे सकृतदर्शनी वाटत होते. परंतु या सगळ्या महिला एम्ब्रॉयडरी वर्क करण्यासाठी तिथे जमलेल्या होत्या. त्यांच्याशी संजीव नय्यर यांनी जवळपास दोन तास गप्पा मारल्या. आपण एका परक्या पुरुषाशी गप्पा मारत आहोत ही भावना त्यांच्या मनातसुध्दा दिसली नाही. इतक्या त्या महिला निर्भयपणे आणि निःसंकोचपणे बोलत होत्या. त्यांचा आत्मविश्‍वास प्रत्ययाला येत होता. त्या महिला पूर्णवेळ कमाई करत नसल्यातरी संसाराला हातभार लावण्यासाठी पैसा कमवत होत्या आणि त्यासाठी वेळ देत होत्या.

त्या महिलांच्यामध्ये बराच आत्मविश्‍वास होता. परंतु त्यांना हवी तेवढी संधी मिळत नव्हती. आमचे नवरे चांगले असते तर आम्ही खूप काही करू शकलो असतो असे त्यांनी उघडपणे सांगितले. त्या महिला नय्यर यांच्याशी एवढ्या बिनधास्तपणे बोलत होत्या की ही भेट संपल्यानंतर नय्यर जायला निघाले तेव्हा त्यातल्या काही महिलांनी, त्यांना राजस्थानी मिशा छान दिसतात अशी कॉमेंट करायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. अशा प्रकारचा महिलांमधला आत्मविश्‍वास राजस्थानमध्ये दिसावा याचे नय्यर यांना आश्‍चर्य वाटले परंतु राजस्थानमध्ये हजारो महिला आपली कर्तबगारी नित्य सिध्द करत आहेत.

Leave a Comment