त्रेतायुगातले सूर्यपुत्र शनिदेव मंदिर

shani
देशभरात सूर्यपुत्र शनिदेवाची अनेक मंदिरे पाहावयास मिळतात मात्र ग्वाल्हेर पासून १८ किमी अंतरावर मुरना येथे असलेले शनीचराधाम अथवा शनीमंदिर हे प्राचीन मंदिर प्रसिद्ध शनीमंदिरांपैकी एक आहे. हे मंदिर त्रेतायुगातले असल्याचे सांगितले जाते व येथील शनीपिंड महाबली हनुमानानाने लंकेतून फेकला आहे असा समज आहे. शनीला तेल वाहण्याची परंपरा फार प्राचीन असून या मंदिरातही ती पाळली जातेच पण येथे येणारे भाविक शनीला तेल अर्पण केल्यानंतर त्याला गळामिठी घालतात.

येथे गळामिठी घालण्यामागे शनीदेवाला आपली सुखदुःखे सांगायची असा उद्देश आहे. इतकेच नव्हे तर शनीदर्शन केल्यानंतर भाविक आपली पापे, दारिद्रय यातून सुटका होण्यासाठी अंगावरचे कपडे, चपला येथेच सोडूनही जातात. या मागे भाविकांच्या आयुष्यात येणारी संकटे शनीदेव स्वतःच्या गळ्यात घेतो असाही समज आहे. येथे मनापासून उपासना करणार्‍यांच्या सर्व मनोकामना त्वरीत पूर्ण होतात असाही अनुभव भाविक सांगतात.

अशी कथा सांगतात की शनीदेवाला रावणाने कैद केले होते. त्याची हनुमानाने लंकादहनानंतर कैदेतून सुटका केली व शनीपिंड येथील शनीपर्वतावर फेकला. राजा विक्रमादित्याने या मंदिराचे काम सुरू केले व पुढे सिदीयांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. शनी अमावस्येला येथे मोठी जत्रा भरते व देशविदेशातून अनेक भाविक येथे शनीदर्शनासाठी येतात.

Leave a Comment