रजनी पंडित- देशातली पहिली महिला डिटेक्टीव्ह

rajni
हेरगिरी हा सर्वसाधारणपणे मर्द लोकांचा प्रांत समजला जातो मात्र या क्षेत्रातही गेल्या २५ वर्षात ७५ हजारांहून अधिक केसेस सोडवून भारताची पहिली महिला डिटेक्टीव्ह रजनी पंडित हिने आपले नांव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. ४७ वर्षीय रजनीला भारताची जेम्स बाँड अशा सार्थ नावानेही ओळखले जाते. विशेष म्हणजे महाराष्ट*ातील ठाण्याची रहिवासी असलेली रजनी या क्षेत्रात चांगलीच स्थिरावली असून तिच्या हाताखाली २० जणांचा स्टाफही आहे.

रजनीने मराठी साहित्य विषयात मुंबई विद्यापीठाची पदवी घेतली असून तिला हेरगिरीचे बाळकडू घरातूनच मिळाले आहे. तिचे वडील सीआयडी मध्ये होते व म.गांधी हत्याकांडाच्या तपासात त्यांचा सहभाग होता. रजनीच्या हेरगिरीची सुरवात कॉलेजकाळापासूनच झाली. रजनी सांगते माझी एक मैत्रीण या काळात चुकीच्या मार्गाला लागली होती व मी ही सारी माहिती तिच्या घरच्यांना दिली तेव्हा त्यांनी मला तू हेरगिरी करतेस का असे विचारले व त्यातूनच हेच प्रोफेशन आपण स्वीकारायचे असा मनोमन निश्चय केला.

त्यातून रजनी पंडित डिटेक्टीव्ह सर्व्हिस सुरू झाली. आजपर्यंत ७५ हजारांहून अधिक केसेस यशस्वीपणे सोडविलेल्या रजनीला या कामासाठी कधी मोलकरीण, गरोदर महिला, अपंग, भिकारी अशा अनेक भूमिका कराव्या लागल्या आहेत.एका केसमध्ये तर तिने संबंधित घरी सहा महिने मोलकरणीचे कामही कले आहे. आमच्या शब्दकोशात भीती हा शब्द नाही असे अभिमानाने सांगणारी रजनी म्हणते, गुप्तहेराला आपली ओळख लपविणे हेच सर्वात अवघड काम असते. दररोज १४ तासांहून अधिक वेळ काम करणारी रजनी हे काम पैशांसाठी नाही तर लोकांना मदत म्हणून प्रामुख्याने करत असल्याचे सांगते. ती म्हणते, कोणतीही केस यशस्वीपणे सोडविणे हीच माझी खरी कमाई आहे.

रजनीला महाराष्ट्र सरकारच्या हिरकणीसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिची दोन पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. पैकी मायाजाल या पुस्तकाला सहा तर फेस बिहाईंड फेसला दोन पुरस्कार मिळाले आहेत. ती सध्या एका डॉक्युमेंटरीतही काम करते आहे.

Leave a Comment