लातूरच्या गड्याने केला सलग ५० तास फलंदाजीचा विश्वविक्रम

world-record
लातूर : लातूर जिल्ह्यातील सोनवती गावचा सामान्य कुटुंबातील तरुण विराग मरे याचे नाव सलग ५० तास ४ मिनिटे व ५१ सेकंद फलंदाजी केल्याने ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नोंदले गेले आहे. त्याच्या या यशामुळे लातूर जिल्ह्याचा लौकिक वाढला आहे. या कामगिरीमुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

बाभळगाव येथील दयानंद विद्यालयात विरागचे प्राथमिक शिक्षण झाले आहे. इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे त्याचे शिक्षण या शाळेत झाले आहे. त्याने ‘लाँगेस्ट इन्डीयूज्वल नेट सीझन’ (मेल) मध्ये २२ डिसेंबर २०१५ रोजी सकाळी ९.३० मिनिटे ते दि. २४ डिसेंबर २०१५ सकाळी ११.३५ मिनिटे व ५१ सेकंद या कालावधीत त्याने एकूण २४४७ ओव्हर्सचा (एकूण चेंडू १४६८२) सामना केला आहे. तो जगातील सर्वाधिक क्षमता असलेला फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हे रकॉर्ड दोघांनी केले होते. यात इंग्लंडचा डेव्हीड न्यू मॅन व रिचर्ड वील्स याने ४८ तास २ सेकंद तर ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅल्बे शेल याने २६ तास फलंदाजी करुन रेकॉर्ड केले होते. विरागने गेली ३ वर्षे पुणे येथे सराव केला. या रेकॉर्डमध्ये त्याला जवळपास १५० गोलंदाजांनी गोलंदाजी केली आहे. तो जगातील सर्वाधिक जास्त चेंडू खेळणारा फलंदाज ठरला आहे. त्यास नेक्स्ट क्रिकेट अ‍ॅकॅडमीचे मार्गदर्शक कोच अतुल गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे या यशाबद्दल विविध नामवंतांनी कौतुक केले आहे. लोकसभा, विधान परिषद तसेच मनपातील प्रतिनिधीनी त्याचे कौतुक केले आहे. त्याने अत्यंत बिकट परिस्थितीशी सामना करीत हे यश संपादन केले आहे. या वर्ल्ड रेकॉर्ड खेळीमुळे जमा होईल तो निधी काही गरीब रुग्णांना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुणे येथे त्याने वडा पावचेही दुकान सुरू केले होते. क्रिकेटमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व दाखवून देण्यासाठी त्याने वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. तो आता मुंबईतील स्थानिक क्रिकेटकडून खेळणार आहे.

Leave a Comment