सिंहस्थात शहीद जवानांसाठी होताहेत यज्ञ

balyogi
उज्जैन येथे महाकुंभ सिंहस्थ पर्वणी आता ऐन भरात आली असून विश्वशांती, धर्मशांती व मानव कल्याण अशा विविध कारणांसाठी यज्ञ केले जात आहेत. यातच बालक योगेश्वरदास महाराज यांचाही कँप असुन ते देशासाठी जान कुर्बान केलेल्या जवानांसाठी यज्ञात आहुत्या देत आहेत. त्यासाठी शहीद जवानांच्या परिवारांना स्वखर्चाने आणण्याची व्यवस्थाही महाराजांनी केली आहे. विशेष म्हणजे स्वतः फौजी परिवारातून आलेले बालक योगेश्वर महाराज गेली १३ वर्षे शहीद जवानांसाठी यज्ञ करत आहेत.

बालक योगेश्वरदास महाराजांच्या यज्ञशाळेत चारीबाजूंनी शहीद जवानांची पोस्टर लावली गेली आहेत. त्यात संसद हमला,२६/११ मुंबई हल्ला, अक्षरधाम हल्ला ते सियाचीन लँड स्लाईडमध्ये बळी पडलेले हनुमंथप्पा यांच्यापर्यंत अनेक जवानांचे फोटो आहेत. तसेच येथे देशाचा तिरंगाही डौलाने फडकत आहे. १९ एप्रिल ते १९ मे या काळात अतिविष्णु महायज्ञ येथे केला जात असून त्यात १०० कोटी आहुती दिल्या जाणार आहेत. त्यासाठी देशभरातून शहीद जवानांची ४५० कुटुंबे निमंत्रित केली गेली आहेत. त्यांच्या रेल्वे प्रवासाचा खर्च महाराजांनी केला आहे.

बालक योगेश्वरदास महाराज वयाच्या ८ व्या वर्षापासून संन्यस्त जीवन जगत आहेत. मुळचे जम्मूकाश्मीरचे हे कुटुब, त्यांचे वडील व भाऊ लष्करात होते. ते म्हणतात, शालेय वयापासूनच मुलांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत केली गेली पाहिजे. महाराजांनी बद्रीनाथापासून ते कन्याकुमारीपर्यंत सात वेळा देशभ्रमण केले आहे. येथील यज्ञांनंतर ते जम्मूकाश्मीर मध्येही शहीद जवानांसाठी आणखी तीन यज्ञ करणार आहेत.

Leave a Comment