पतीच्या दीर्घायुष्यासाठी विधवेचे जिणे

widows
भारतातच नव्हे तर जगभरातल्या अनेक देशांत कांही अनोख्या परंपरा पाळल्या जातात व आजच्या विज्ञान युगातही त्यात कांहीही बदल झालेला नाही. भारतीय संस्कृतीत चांगला पती मिळावा व पतीला दीर्घायुष्य लाभावे यासाठी अनेक परंपरा आहेत. वटसावित्री, हरतालिका, करवा चौथ, दिवाळी पाडवा अशा अनेक प्रकारे या परंपरा पाळल्या जातात. भारतीय संस्कृतीत सौभाग्यवती महिलने पती जिवंत असताना सौभाग्यलेणी उतरविणे हा अपशकून मानला जातो पण तरीही उत्तरप्रदेशातील देवरिया, गोरखपूर, कुशीनगर व बिहारच्या कांही भागात अनोखी परंपरा आजही पाळली जाते.

या भागात वस्ती असणारे गछवाहा समाजाचे लोक ही प्रथा पाळतात. त्यानुसार या समाजातील महिला वर्षातले चार महिने पती जिवंत असतानाही विधवेसारखे आयुष्य जगतात. यामागे पतीला दीर्घायुष्य मिळावी हीच भावना आहे. हे लोक ताडाच्या झाडावरून ताडी काढण्याचे काम करतात.५० फूट उंचावर चढून ताडी काढणे हे काम जोखमीचे आहे व ते चैत्रापासून ते श्रावणापर्यंत केले जाते. त्यामुळे या काळात विवाहीत महिला आपली सौभाग्यलेणी उतरवून ती तरकुल्हा देवीपाशी ठेवतात.त्यामुळे या काळात या महिला कुंकू लावत नाहीत, श्रृंगार करत नाहीत. तरकुल्हा देवी हे या समाजाचे मुख्य धार्मिक स्थळ आहे. ताडी काढण्याच्या काळात देवी महिलांच्या सौभाग्याचे रक्षण करते असा समज आहे.

ताडी काढण्याचे काम संपले की नागपंचमीच्या दिवशी या महिला देवीच्या मंदिरात जाऊन तिची पूजा करून प्रथम भांगात सिंदूर भरतात. ही परंपरा कधीपासून पाळली जाते आहे याचे संदर्भ मिळत नाहीत. मात्र ती दीर्घकाळ सुरू असावी असा अंदाज वर्तविला जातो.

Leave a Comment