आता अवघ्या ८८८ रुपयात मिळणार स्मार्टफोन

docoss
मुंबई – फ्रीडम २५१ या सर्वांत स्वस्तातील स्मार्टफोनवरून काही दिवसांपूर्वी उडालेला वाद शांत होत नाही, तोच आणखी एका कंपनीने स्वस्तातील स्मार्टफोनसाठी नोंदणी सुरु केली आहे. डोकॉस या कंपनीने डोकॉस X1 हा स्मार्टफोन ८८८ रुपयात देण्याची ऑफर दिली असून, कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. येत्या २९ एप्रिलला रात्री दहा वाजेपर्यंतच या हॅण्डसेटसाठी बुकिंग करता येणार आहे.

हा स्मार्टफोन वेळेत बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना दोन मेपर्यंत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कंपनीने कॅश ऑन डिलिव्हरी सुविधाही दिल्यामुळे हॅण्डसेटचा ताबा मिळाल्यावरच ग्राहक त्याचे पैसे चुकते करू शकणार आहे. डोकॉस X1 मध्ये १.३ गिगाहर्टझचा ड्युअल कोअर कोर्टेक्स ए७ प्रोसेसर असून त्याची रॅम एक जीबीची आहे. ड्युअल सिमकार्डची सुविधा असलेल्या या हॅण्डसेटमध्ये ४ जीबीची अंतर्गत मेमरी आणि ३२ जीबीपर्यंत वाढविता येण्याजोगी मेमरी आहे. या फोनमध्ये ३जी वापरता येईल, असे कंपनीने म्हटले आहे. हॅण्डसेटमध्ये दोन मेगापिक्सलचा मागील कॅमेरा आणि ०.३ मेगापिक्सलचा पुढील कॅमेराही देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनबद्दल माहिती मिळाल्यावर अनेक जणांनी त्याच्या बुकिंगसाठी कंपनीच्या वेबसाईटला भेट देण्यास सुरुवात केली. ही वेबसाईट नीट चालत नसल्याची तक्रार अनेक ग्राहकांनी केली आहे. डोकॉस ही कंपनी जयपूरमध्ये नोंदण्यात आल्याचीही माहिती मिळाली आहे. कंपनीबद्दल काहीच माहिती नसून, ग्राहकांनी सावधपणे खरेदीचा निर्णय घ्यावा, असे काही तज्ज्ञांनी म्हटले आहे.

Leave a Comment