शब्दांचे बुडबुडे

kanhiya1
जेएनयूतील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हासुध्दा छान भाषण करून टाळ्या घेतो. त्यामुळे तो नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मोठा जनक्षोभ निर्माण करील अशी आशा मोदींच्या विरोधकांना लागली आहे. म्हणूनच नरेंद्र मोदी यांना पाण्यात पाहणारे आणि मोदी पंतप्रधान झाल्यापासून आजारी पडलेले सगळे मोदीद्वेष्टे या छचोर आणि उथळ वक्त्याच्या पाठीशी उभे राहिले आहेत आणि हा प्रभावी वक्त एकामागे एक टाळ्याखाऊ वाक्ये टाकून भाषणे गाजवायला लागला आहे. मात्र काही लोकांना त्याची भुरळ पडत असली तरी त्याच्या भाषणातील अपरिपक्वता आणि विरोधाभास या गोष्टी लपून राहत नाहीत. वास्तविक त्याच्यावर असे लिखाण करून त्याला मोठे करण्यात काही अर्थ नाही असे म्हटले जात असले तरी त्याच्यावर लिहिल्याने तो मोठा होणार नाही. कारण प्रसिध्दी हे मोठे होण्याचे एकमेव साधन नसते. प्रसिध्दी ही पूरक असते. मुळात माणसाकडे काहीतरी तळमळ आणि तर्कशुध्दता असली पाहिजे. त्याशिवाय त्याच्या पाठीशी प्रचंड सामाजिक कार्य केल्याचे पाठबळ हवे. असा माणूस प्रसिध्दीने मोठा होण्यास मदत मिळते.

काही लोक कन्हैयाला मिळालेल्या प्रसिध्दीमुळे अस्वस्थ होत आहेत आणि त्याला उगीच मोठा करू नका असा सल्ला देत आहेत. परंतु प्रसिध्दीने तो मोठा होईल अशी भीती बाळगण्याचे काही कारण नाही. कारण केवळ प्रसिध्दीने माणूस मोठा होत असता तर राहुल गांधी आज फारच मोठे झाले असते. गेल्या दहा-पंधरा वर्षात ज्यांनी स्वतःवर प्रसिध्दीचे झोत वळवून घेण्यात यश मिळवले त्यांची परिस्थिती पाहिली तर आपल्याला असे लक्षात येईल की केवळ प्रसिध्दीने माणसे मोठी झालेली नाहीत. त्यामध्ये अनेक नावे आपण घेऊ शकतो. त्यात दिग्विजय सिंग असतील किंवा संघ परिवारातील विचित्र विधाने करणारे काही नेतेही असतील. ते केवळ भाषणामुळे मोठे होऊ शकलेले नाहीत. कन्हैयाकुमारच्या भाषणात तर कितीतरी विसंगती आहेत. खोटारडेपणा आहे. देशातली कोणतीही गोष्ट काही कारण नसताना नरेंद्र मोदीकडे वळवण्याचा व्यर्थ प्रयास असेल. ज्यामुळे मोदी उघडे न पडता तो स्वतःच उघडा पडतो. त्याने नरेंद्र मोदी यांना आपल्या तंत्रज्ञानाचा एक तरी झोत मराठवाड्याकडे वळवावा असा सल्ला दिला आहे. परंतु कन्हैयाकुमारला ही गोष्ट माहीत नाही की मराठवाड्यातल्या दुष्काळग्रस्त लोकांना जो काही थोडा फार दिलासा मिळत आहे तो नरेंद्र मोदींच्या तंत्रज्ञानामुळेच मिळत आहे. लातूरला पाणी मिळत नाही म्हणून मोदी सरकारने तंत्रज्ञानाची कमाल करून कमीत कमीत वेळेत रेल्वेचे टँकर भरून ते लातूरला आणून दिलेले आहेत.

एका बाजूला नरेंद्र मोदी तंत्रज्ञानाची अशी कमाल करत असताना कन्हैयाकुमार मात्र अशा लोकांकडून प्रायोजित केला जात आहे आणि अशा लोकांच्या पैशातून विमानातून फिरून गरिबीशी लढत आहे त्याच लोकांनी मराठवाड्यातले प्रश्‍न निर्माण केले आहेत. अर्थात कन्हैयाकुमार त्यांच्याबद्दल बोलणार नाही कारण तो आता त्यांच्याच तालावर नाचणार आहे. कन्हैयाकुमारच्या प्रत्येक वाक्यावर टिप्पणी करून तो कसा उथळ बोलत आहे हे ध्यानात आणून देता येते. परंतु अशा छोट्या छोट्या वाक्यांकडे लक्ष न देता एका मोठ्या विसंगतीकडे लक्ष वेधायचे ठरवले तर त्याच्या आझादीचा उल्लेख करता येईल. कन्हैयाकुमार हा स्वतः आणि त्याच्या मागे हुरळल्यासारखे फिरणारे काही नेते आझादी मागत आहेत. त्यांना बेरोजगारीपासून आझादी हवी आहे आणि पूंजीपतीकडूनसुध्दा आझादी हवी आहे. त्यांच्या हे लक्षात येत नाही की बेरोजगारीपासून आझादी हवी असेल तर शिकलेल्या तरुण लोकांना नोकर्‍या हव्या असतील तर त्या नोकर्‍या पूंजीपतीच निर्माण करू शकतात. तेव्हा बेरोजगारीपासून मुक्तता हवी असेल तर पूंजीपतीकडून मुक्तता मिळू शकणार नाही.

अर्थात हा केवळ कन्हैयाकुमारचाच दोष नाही तर कथित डाव्या विचारांच्या सार्‍या संघटनांच्या आणि पक्षांच्या मनातला गोंधळ असाच आहे. कन्हैयाकुमार हा भारतीय कम्युनिष्ट पार्टी प्रणित विद्यार्थी संघटनेचा नेता आहे आणि त्याचा हा साम्यवादी पक्ष पश्‍चिम बंगालमध्ये ३५ वर्षे सत्तेवर होता. या ३५ वर्षांच्या काळात त्यांच्या सरकारने गरिबी हटवण्याचा कसलाच कार्यक्रम राबवला नाही. त्यामुळे पश्‍चिम बंगाल हे राज्य नेहमीच गरीब राज्यांच्या यादीत समाविष्ट होत राहीले. त्यांच्या सरकारने गरिबी हटवण्याऐवजी आहे ती गरिबी वाटण्यातच समाधान मानले. त्यामुळे पश्‍चिम बंगालमध्ये कधीच समृध्दी आली नाही. शेवटी शेवटी पूंजपतीच्या नावाने बोटे मोडणार्‍या साम्यवाद्यांच्या या सरकारने रतन टाटा यांना निमंत्रित करून त्यांचा टाटा मोटर्सचा कारखाना आपल्या राज्यात शिंगूर येथे उभारण्यासाठी निमंत्रण दिले. त्यासाठी ९०० एकर जमीन संपादित केली. शेवटी या जमीन संपादनातील कथित अन्यायाला वाचा फोडतच ममता बॅनर्जींनी कम्युनिष्टांची ही दरिद्री राजवट संपवली. परंतु आपली राजवट संपता संपता का होईना या साम्यवाद्यांना एवढी तरी अक्कल आली की पूंजीपतीच्या नावाने बोटे मोडण्यात काही अर्थ नाही. शेवटी रोजगार निर्मिती पूंजीपतीच करत असतात. मात्र भाषणामध्ये पूंजीपतींना शिव्या दिल्या की टाळ्या मिळतात आणि त्यासाठी कन्हैयाकुमार पूंजीपतींपासून मुक्ती मिळवू इच्छित आहे आणि त्या करिता पूंजीपतींच्या मालकीच्या विमानातून देशात भ्रमण करत आहे.

Leave a Comment