१५ हजारांचे प्राण घेऊ शकते सोनेरी बेडकाचे १ ग्रॅम विष

frog
बीजिंग : विषारी जीव म्हटले की आपल्या कल्पनेची धाव सापाच्या पुढे जात नाही. मात्र, जगात अन्यही अनेक विषारी जीव आहेत. त्यामध्ये ‘गोल्डन डार्ट’ बेडकाचाही समावेश आहे. चीनच्या अधिका-यांनी एका पार्सलमधील अत्यंत विषारी असे हे १० बेडूक जप्त केले आहेत. या गोल्डन डार्ट बेडकांचे फक्त १ ग्रॅम विष १५ हजार लोकांचा जीव घेऊ शकते. हे पार्सल पोलंडहून आले होते. बीजिंगच्या क्वारंटाइन अधिका-यांनी हे पार्सल या महिन्याच्या सुरुवातीला पकडले होते. त्यावर ‘कपडे आणि भेट’ असे लिहिले होते. संशय आल्याने पार्सल उघडण्यात आले. त्यात प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये चमकदार रंगांचे बेडूक होते. बीजिंग येथील इन्स्पेक्शन अँड क्वारंटाइन विभागाच्या माहितीनुसार, दोन इंच लांबीचे हे गोल्डन डार्ट बेडूक पृथ्वीवरील सर्वांत घातक मानले जाते. हे बेडूक कोलंबियाच्या प्रशांत महासागराच्या किना-याजवळील जंगलात आढळते. यापूर्वी सप्टेंबर २०१५ मध्ये हाँगकाँगहून आलेल्या एका पार्सलमधूनही असेच काही बेडूक आले होते. या बेडकाच्या काही प्रजाती धोक्यात आहेत.

Leave a Comment