नवी दिल्ली : संपूर्ण जगाला २०२० पर्यंत महारोगापासून मुक्ती देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून एक विशेष अभियान सुरू करण्यात आले.
संघटनेच्या पुढाकाराने सुरू झालेले हे अभियान भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे नव्याने ओळख पटविण्यात आलेल्या महारोग्यांच्या एकूण संख्येपैकी ८० टक्कयांपेक्षा जास्त रुग्ण असलेल्या तीन देशांमध्ये भारताचा समावेश आहे. जगाला महारोगमुक्त करण्यासाठी या रोगाचे संक्रमण रोखण्याच्या दृष्टीने कठोर कटिबद्धतेसह वेगाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे.
जग २०२० पर्यंत होणार महारोगमुक्त
महारोगमुक्तीसाठी पुढाकार घेणे, जबाबदारी निश्चित करणे आणि सर्वसमावेशकता या तत्त्वांच्या आधारे यासंबंधीचे नवे जागतिक धोरण निश्चित करण्यात आले आहे. धोरणाची अंमलबजावणी योग्यप्रकारे झाली तरच ते धोरण चांगले ठरू शकते, असे हूच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या विभागीय संचालक पूनम खेत्रपालसिंग यांनी या अभियानाचा प्रारंभ केल्यानंतर बोलताना सांगितले. २०२० पर्यंत महारोग आणि इतर संबंधित रोगाची लक्षणे आढळून येणा-या बालकांची संख्या शून्यावर आणण्याच्या उद्देशाने हे अभियान हाती घेण्यात आले आहे.
संघटनेने दिलेल्या माहितीनुसार २०१४ साली १३ देशांमध्ये महारोगाचे २,१३,८९९ रुग्ण आढळून आले. त्यामध्ये बांगला देश, ब्राझील, कॉंगो, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, मादागास्कर, म्यानमार, नेपाळ, नायजेरिया, फिलिपाईन्स, श्रीलंका आणि टान्झानिया या देशांचा समावेश आहे. यापैकी भारत, ब्राझील आणि इंडोनेशिया या तीन देशांमध्ये नव्या रुग्णांच्या एकूण संख्येपैकी ८१ टक्के रुग्ण आढळून आले.