आता एलजीच्या जी ५ चेही SE व्हर्जन

lg-g5
मुंबई : SE सीरिजमधील तुलनेने स्वस्त आयफोन अॅपलने लाँच केल्यानंतर एलजी या स्मार्टफोन उत्पादक कंपनीनेही त्यांच्या एलजी जी५ या हायएन्ड फ्लॅगशिप स्मार्टफोनची SE एडिशन मार्केटमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

एलजी जी५ या फ्लॅगशिपचे SE व्हर्जन लाँच करणार असल्याची चर्चा स्मार्टफोन आणि गॅझेटप्रेमींच्या क्षेत्रात अनेक दिवसांपासून होती, आता त्याला पूर्णविराम मिळाला आहे. एलजी जी५ च्या SE व्हर्जनमध्ये लेटेस्ट अँड्राईड ओएस मार्शमेलो बरोबरच स्नॅपड्रॅगनचा ६२५ हा कमी क्षमतेचा प्रोसेसर असल्याचे रशियातून आलेल्या वृत्तात म्हटले आहे. एलजीच्या जी५ या स्मार्टफोनमध्ये सध्या स्नॅपड्रॅगन ८२० हा सध्याचा सर्वात शक्तीशाली प्रोसेसर आहे. मात्र SE व्हर्जनमध्ये प्रोसेसरची क्षमता घटवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

एलजीने जी५ या स्मार्टफोनची घोषणा वर्ल्ड मोबाईल काँग्रेसमध्ये केली होती. त्यानंतर रशियात एका कार्यक्रमात एलजीनेच जी५ च्या SE व्हर्जनची घोषणा केली. हायएन्ड एलजी जी५ आणि त्याचे SE व्हर्जनमध्ये सध्या तरी फक्त प्रोसेसरचाच काय तो फरक आहे. रशियातून आलेल्या काही रिपोर्ट्सवरुन एलजी जी५ च्या एसई व्हर्जनमध्ये रॅमबाबतही काहीशी तडजोड करण्यात आल्याची शक्यता आहे. एलजी जी५ या स्मार्टफोनला ४ जीबी रॅम आहे तर त्याच्या SE व्हर्जनसोबत ३ जीबी रॅम देण्यात आले आहेत. अन्य स्पेसिफिकेशन्समध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही. म्हणजे एलजी जी ५ आणि एलजी जी५ SE या दोन्ही व्हर्जनमध्ये स्क्रीन ५.३ इंच आणि डिस्प्ले QHD रिझोल्यूशनचा आहे.

एलजी जी५ आणि एलजी जी५ SE या दोन्ही व्हर्जनमध्ये कॅमेराही सारखाच आहे. दोन्ही स्मार्टफोनचा रिअर म्हणजे मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा तर फ्रंट म्हणजे सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सेलचा आहे. दोन्ही स्मार्टफोनची बॅटरी २८०० mAh क्षमतेची असून फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा देण्यात आली आहे.

Leave a Comment