भारताने चीनला परकीय गुंतवणुकीत पछाडले

fdi
नवी दिल्ली : भारताने गेल्या वर्षी थेट परकीय गुंतवणूक (एफडीआय) आकर्षित करण्यात चीनला मागे टाकल्याची माहिती एका अहवालाद्वारे समोर आली असून गेल्या वर्षी घोषित झालेल्या प्रकल्पांमधून ६३ अब्ज डॉलर एवढी परकीय गुंतवणूक भारतात होणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, आठ टक्‍क्‍यांनी भारतामध्ये नव्याने सुरू होणाऱ्या प्रकल्पांच्या संख्येतही वाढ झाली असून देशात गेल्या वर्षभरात ६९७ प्रकल्प सुरू होण्याविषयी करार झाले. भारतामध्ये अनुक्रमे पाच अब्ज आणि चार अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा निर्णय ‘फॉक्‍सकॉन‘ आणि ‘सन-एडिसन‘ यांसारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांनीही घेतला आहे. या वृत्तानुसार, २०१५ मध्ये भारतामध्ये मोठ्या गुंतवणुकीचे प्रकल्प जाहीर झाल्याने ‘सर्वाधिक परकी गुंतवणूक आकर्षित करणारा देश‘ म्हणून भारताने चीनला मागे टाकले आहे.

भारताने परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात प्रथमच पहिले स्थान पटकविले असून यात भारताने अमेरिका (५९.६ अब्ज डॉलर) आणि चीन (५६.६ अब्ज डॉलर) यांना मागे टाकले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, परकीय गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या पहिल्या दहा क्रमांकांमध्ये भारतातील पाच राज्यांचा समावेश आहे. यात गुजरातने (१२.४ अब्ज डॉलर) देशात आघाडी मिळविली आहे. महाराष्ट्रामध्ये ८.२८ अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचे प्रस्ताव आहेत. याशिवाय आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि झारखंड या राज्यांनीही गुंतवणुकीच्या पातळीवर लक्षणीय कामगिरी बजावली आहे.

Leave a Comment