देशविदेशात फिरताना अनेकदा भाषा हा मोठा अडथळा ठरतो. पर्यटनाची खास आवड असलेल्यांसाठी ही अडचण लक्षात घेऊन एक खास टी शर्ट बनविला गेला आहे. हा टी शर्ट तुम्ही कांहीही न बोलताही तुम्हाला काय हवेय ते समोरच्याला अचूक सांगू शकणार आहे. तसेच भाषेचे सर्व अडथळे तो दूर करणार आहे. म्हणजे तुम्ही काय बोलताय ते संबंधित देशांतील लोकांना हा टी शर्ट समजून देऊ शकणार आहे. शिवाय तुमचे स्टाईल स्टेटमेंट म्हणूनही तो कामी येणार आहे.
पर्यटनासाठी बनला हा खास टी शर्ट
स्वित्झर्लंडच्या तीन मित्रांनी म्हणजे जॉर्ज, स्टीव्हन आणि फ्लोरियन यांनी हा टीशर्ट बनविला आहे. या तिघा पर्यटन वेड्या मित्रांना अन्य देशात फिरताना भाषेमुळे किती अडचणी येतात याचा अनुभव आल्यानंतर ही कल्पना सुचली. त्यातून या टी शर्टवर ४० अतिमहत्त्वाचे आयकॉन त्यांनी छापले. त्यात कार, आग, टूल्स, घड्याळ, कॅमेरा, वायफाय सिंबॉल असे अनेक आयकॉन आहेत. त्या आयकॉनवर बोट ठेवून तुम्ही कोणत्याही देशातील माणसांशी विना भाषा संवाद साधू शकता किंवा आवश्यक ती चौकशी करू शकता असा त्यांचा दावा आहे.