यशोगाथा कोटा गावाची

vk-bansala
राजस्थानातले कोटा हे गाव एक छोटेच पण औद्योगिक शहर म्हणून नावाजलेले होते पण आता या गावाने प्रवेश परीक्षा शिकवणीची पंढरी म्हणून नाव कमावले आहे. देशातल्या सर्व राज्यांतले अशा प्रवेश देणारे बारावीचे विद्यार्थी या गावात येऊन राहतात. या गावाने हा महिमा कमावला आहे तो काही एक दोन वर्षात कमावलेला नाही. सुमारे ३५ वर्षांची ही तप:श्‍चर्या आहे. आज या गावात दीड लाख विद्यार्थी क्लाससाठी येतात. त्यातले ७५ टक्के विद्यार्थी राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि बिहार या चार हिंदी भाषक राज्यातले असतात पण बाकीच्या २५ टक्क्यांत सारा भारत देश दिसतो कारण त्यात महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, बंगाल, ओरिसा अशी अनेक राज्ये असतात. या विद्यार्थ्यांची गर्दी एवढी असते की, त्यांना रहायला आणि झोपायला चांगली जागा मिळेल याची काही शाश्‍वती नाही पण त्यांना फी मात्र लाखांत द्यावी लागते. म्हणूनच मुले हाल सहन करीत राहतात आणि शिक्षक मात्र आलिशान मोटारीत फिरत असतात.

तशी या गावाची या क्षेत्राकडील वाटचाल १९८६ साली सुरू झाली. या काळात या गावात जे. के. सिंथेटिक्स ही कापड गिरणी होती आणि इन्स्ट्रुमेंटेशन लिमिटेड हा कारखाना होता. कापड गिरणीत व्ही. के. बन्सल हे अधिकारी होते. त्यांना काही आजार झाल्यामुळे ही नोकरी सोडणे भाग पडलेच पण हे दोन्ही धंदेही बंद पडले.मग बन्सल यांनी सहज आपल्या घरातच एक दोन मुलांना प्रवेश परीक्षांची शिकवणी द्यायला सुरूवात केली. त्यांचीं शिकवण्याची कला अफलातून असल्यामुळे त्यांची ही दोन तीन मुले चांगल्या गुणांनी पास झाली. मग त्यांच्याकडे मुलांची रीघ सुरू झाली. बन्सल यांचे विद्यार्थी यांची मुले बाजी मारतात असे दिसायला लागताच परराज्यातूनही मुले यायला लागली.

बघता बघता कोटा पॅटर्न तयार झाला आणि परराज्यांतूनही मुले यायला लागली. एकदा या गावानेच हा व्यवसाय स्वीकारलाय असे दिसताच गावात मुलांच्या राहण्याचा, जेवण्याचा व्यवसाय मूळ धरायला लागला आणि करोडो रुपयांची उलाढाल सुरू झाली. आता तर या व्यवसायाने फारच वेगळे स्वरूप धारण केले आहे. शिक्षकांची पळवापळवी हा त्यातलाच एक प्रकार. ज्या शिक्षकांचे नाव होते ते शिक्षक आपल्याकडे असले पाहिजेत असा कोचिंग क्लासेसच्या मालकांचा प्रयत्न असतो. पण कोणते शिक्षक कोणाकडे आहेत याची कल्पना वर्षाच्या सुरूवातीलाच येते आणि शिक्षक असतील तिकडे मुलेही धाव घ्यायला लागतात.

Leave a Comment