‘इस्त्रो’ने बनविला सर्वात हलका कृत्रिम पदार्थ

Silica-Aerogel
बर्फाळ प्रदेशातील सैनिकांना त्यापासून बनणार उबदार कपडे
तिरुवनंतपुरम: ‘इस्त्रो’च्या विक्रम साराभाई स्पेस सेंटर येथील संशोधकांनी जगात आतापर्यंत मानवाने बनविलेल्या कृत्रिम पदार्थांपैकी सर्वात हलक्या; म्हणजेच अगदी हवेएवढ्या वजनाचा पदार्थ विकसित केला आहे. ‘सिलिका एरोजेल’ अथवा ‘ब्ल्यू एअर’ असे नामकरण करण्यात आलेला हा पदार्थ अंतराळ मोहिमेतील उपकरणात; तसेच बर्फाळ प्रदेशातील सैनिकांना उबदार कपडे बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

संपूर्णत: भारतीय बनावटीचा ‘सिलिका एरोजेल’ हा पदार्थ एवढा हलका आहे; की त्याचा तुकडा फुलाच्या टोकावर ठेवला तरी फूल सुरक्षित राहू शकते. हा पदार्थ बाह्य वातावरणाचा प्रभावीपणे अवरोध करू शकतो. त्यामुळे हा पदार्थ अंतराळ मोहिमेतील यानांमध्ये पृष्ठभागावर उष्णतारोधक म्हणून वापरला जाणार आहे. त्याचप्रमाणे त्याचे दैनंदिन जीवनात अनेक व्यावहारिक उपयोग आहेत; अशी माहिती स्पेस सेंटरचे संचालक डॉ. के सिवान यांनी दिली.

बर्फाळ प्रदेशात काम करणाऱ्या जवानांचा प्रतिकूल हवामानामुळे होणारे मृत्यू हा विषय ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर अत्यंत थंड वातावरणात काम करणाऱ्या जवानांच्या गणवेशाच्या आत किंवा अति थंड प्रदेशात काम करणाऱ्या कोणीही ‘सिलिका एरोजेल’ने बनविलेले ‘थर्मल वेअर’ वापरल्यास त्यांचे थंडीपासून संरक्षण होऊ शकणार आहे. या पदार्थाचा रंगात वापर करून त्याने खिडक्या रंगविल्यास इमारत थंडीत उबदार आणि उन्हाळ्यात थंड राहू शकणार आहे.

मात्र ९९ टक्के हवेने बनलेला ‘सिलिका एरोजेल’ हा अत्यंत नाजूक पदार्थ आहे. त्यामुळे त्याला अधिक मजबूत आणि टिकाऊ बनविण्याचे प्रयत्न स्पेस सेंटरचे शास्त्रज्ञ करीत आहेत.

Leave a Comment