मुंबई: डॉक्टरांनी आपला व्यवसाय वाढविण्यासाठी आपल्या उपचाराला खात्रीशीर यश येत असल्याची जाहिरात कोणत्याही माध्यमात करू नये; असे निर्देश ‘इंडियन मेडीकल असोसिएशन’ने दिले आहेत. नैतिक मार्गाने व्यवसाय करण्याबाबत देशभरातील डॉक्टर्समध्ये जागृती करण्यासाठी असोसिएशन विशेष मोहीम राबविणार आहे.
‘आयएमए’ने टोचले डॉक्टरांचे कान
मुंबई येथील कुलाब्यामध्ये संततीधारणेचे उपचार करणाऱ्या ‘मालपाणी इन्फर्टिलिटी क्लिनिक’च्या वेबसाईटवर त्यांच्या ‘इन व्हिट्रो फर्टिलायझेशन टेक्निक’द्वारे खात्रीने गर्भधारणा होत असल्याचा दावा करण्यात आला होता. या उपचाराला अपयश आल्यास उपचारासाठी आकारण्यात आलेली रक्कम परत करण्यात येईल; असेही वेबसाईटवर नमूद करण्यात आले होते.
‘ड्रग्ज अँड मेडीकल रेमिडीज अॅक्ट’नुसार डॉक्टरांना कोणत्याही माध्यमात जाहिरात करण्यास बंदी असल्याने अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्डस कौन्सिल’ने या जाहिरातीची दाखल घेऊन क्लिनिकचे संचालक डॉ अनिरुद्ध आणि डॉ अंजली मालपाणी यांच्या विरोधात महाराष्ट्र मेडीकल कौन्सिलकडे तक्रार दाखल केली. या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी घेऊन कौन्सिलने या डॉक्टर दांपत्यावर तीन महिने वैद्यकीय व्यवसायाचा परवाना रद्द करण्याची कारवाई केली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन असे प्रकार टाळण्यासाठी इंडियन मेडीकल असोसिएशनने परिपत्रकाद्वारे देशभरातील अडीच लाख डॉक्टरांना जाहिरात न करण्याची जाणीव करून दिली आहे. तसेच त्याच्या अंमलबजावणीबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
या संदर्भात डॉक्टरांमध्ये जाणीवजागृती करण्यासाठी असोसिएशनच्या वतीने सातत्याने उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. मात्र कोणत्याही उपचारांची शंभर टक्के खात्री देता येत नाही आणि सर्व रुग्णांचे खात्रीने प्राण वाचविणे शक्य नसते; याबाबत रुग्णांमध्येही जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे; असे मत असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एस. एस. आगरवाल यांनी व्यक्त केले आहे.