निकामी मारुती ८००चे सुटे भाग वापरून बनली अनोखी बाईक

bike
पुणे: सामान्यपणे ‘जुगाड’ हा शब्द वाईट अर्थाने वापरला जातो आणि त्याला लबाडीचा स्पर्श असल्याचे मानले जाते. मात्र असेच ‘जुगाड’ करून ‘टाकाऊतून टिकाऊ’ नवनिर्मिती करणारे अनेक जण दिसून येतत. त्यापैकीच एक असलेल्या एका पुणेकर युवकाने घरात निकामी अवस्थेत असलेल्या ‘मारुती ८००’चे सुटे भाग आणि ‘बीएमडब्ल्यू’चे टायर वापरून चक्क ८ फूट लांबीची बाईक तयार केली आहे. काही त्रुटी असूनही ही बाईक तज्ज्ञांच्या पसंतीलाही उतरली आहे हे विशेष!

नीलेश सरोदे या २५ वर्ष वयाच्या मेकेनिकल इंजिनिअर असलेल्या तरुणाची नोकरी आणि सर्वसामान्य आयुष्य तसे शांतपणे आणि संथपणे पुढे सरकत होते. मात्र अचानक त्याचे लक्ष्य त्याच्या घरात असलेल्या त्याच्या बहिणीच्या ‘मारुती ८००’ कारने वेधून घेतले. ती कार तशी निरुपयोगी असल्याने पडून होती. मात्र ती भंगारमध्ये विकून टाकण्यासही कोणाचीच तयारी नव्हती. त्यामुळे नीलेशने त्याच गाडीचे सुटे भाग वापरून काही तरी नावीन्यपूर्ण बनविण्याचा निश्चय केला आणि त्यासाठी आपल्या नोकरीवर पाणी सोडले.

त्याने याच गाडीचे इंजिन चासीवर चढविले. मागच्या चाकासाठी भंगारमधून आणलेले ‘बीएमडब्ल्यू’चे टायर बसवून तब्बल ८ फूट लांबीची बाईक बनविली. आतापर्यंत कारचे इंजिन आणि गिअर बॉक्स बाईकच्या चासीवर चढविण्याचे काम कोणालाच जमले नव्हते. मात्र ‘ऑटोमोबाईल’ तंत्रज्ञानाचा गंधही नसलेल्या नीलेशने ते शक्य करून दाखविले. एकूण २ लाख रुपये खर्च करून बनलेली ही गाडी एक लिटर पेट्रोलमध्ये ३५ किलोमीटर प्रवास करू शकते.

त्याच्या या अनोख्या कामगिरीकडे विख्यात बायकर आणि जुन्या बाईक्सचे संग्राहक असलेल्या बलजितसिंग कोचर यांचे लक्ष्य वेधले गेले. त्यांना नीलेशची ही कामगिरी प्रभावित करून गेली. अर्थात सहा फूट उंच असलेल्या नीलेशला ही गाडी चालविणे सोपे होते. मायर त्याच्यापेक्षा काहीसे कमी उंच असलेल्या कोचर यांना विशेषत: गर्दीच्या ठिकाणी ही गाडी सावरणे जर कठीण गेले. त्याचप्रमाणे गाडीचा गिअर बदलताना ते सुरळीतपणे बदलत नहॆत. त्यावेळी चासीला थोडे हादरे बसतात; हेही त्यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले. मात्र एकूणात नीलेशचा हा प्रयोग त्यांना प्रभावित करून गेला.

या प्रयोगानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रातच करीअर करण्याचे नीलेशने निश्चित केले असून बाईक शौकिनांना आपल्या ज्ञानाचा फायदा करून देण्यासाठी आपला सल्ला उद्योग सुरू करण्याचा त्याचा मानस आहे.

Leave a Comment