ताडोबा, पेंचमध्ये व्याघ्र संरक्षणासाठी सज्ज वनरागिणी

tiger
प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून कार्यरत असलेल्या महिला युद्ध क्षेत्रातही मागे नाहीत. रणरागिणी अशा यथार्थ नावाने त्या ओळखल्याही जातात. मात्र अभयारण्यातील वाघांच्या संरक्षणासाठीही असेच महिला दल कार्यरत आहे याची कदाचित फारच थोड्यांना माहिती असेल. यंदा भारतात वाघांच्या संख्येत वाढ झाल्याचे नॅशनल टायगर कॉन्झर्व्हेशन अॅथॉरिटीच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहेच आणि या वाढीमागे या वनरागिणींचे योगदानही फार मोठे आहे. महाराष्ट्रातील ताडोबा आणि पेंच अभयारण्यात स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स खाली २८ महिलांचा एक गट कार्यरत आहे. मध्यप्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवरच्या या भागात दररोज २० ते २५ किमीची भटकंती करून या महिला वाघांचे संरक्षण करण्याबरोबरच वनसंपदेची तस्करी रोखण्याचेही काम मोठ्या धाडसाने करत आहेत.

tiger1
या गटातील एक वनरागिणी आरती फुले सांगतात, दररोज दिवसातले किमान आठ तास आम्ही गस्त घालतो. आमचा गट दोन विभागात विभागला गेला आहे. एका गटात १४ महिला, २ गार्ड व रेंज फॉरेस्ट अधिकारी असतात. दररोज किमान २० ते २५ किमीची भटकंती आम्ही करतो. या भटकंतीत अनेकदा वाघ, बिबटे, अस्वले, तरस असले वन्य प्राणी भेटतात पण आम्हाला खरा धोका आहे तो चोरून शिकारी करणार्‍या पोचर्सपासून. ते वाघ मारण्यासाठी सापळे लावतात, प्राण्यांच्या पाणी पिण्याच्या ठिकाणी विष टाकतात त्याचबरोबर जंगलातील लाकूड व अन्य किमती सामान तस्करी करून नेतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे हाही आमच्या कामाचा भाग आहे.

दिवसा रात्री कधीही गस्तीवर आम्ही बाहेर पडतो. आजपर्यंत चोरटया शिकार्‍यांच्या तावडीतून आम्ही अनेक वन्य प्राणी व मुख्यतः वाघ वाचविेले आहेत. बरेचदा तस्कर व पोचर्सशी सामनाही करावा लागतो त्यावेळी मात्र सगळे रूटीन उलटेसुलटे होऊन जाते. पण आमची गस्त आहे असे लक्षात आल्यापासून या अभयारण्यात एकाही वाघाची शिकार झालेली नाही. आमच्या गटाला मिनी आर्मी असेच म्हणतात.या महिलांना सहा महिनांचे कडक प्रशिक्षण दिले गेले आहे. त्यात शारीरिक शिक्षणाबरोबरच वन व्यवस्थापन,वन्य प्राणी संरक्षण,जंगल कायदे, शिकारी, तस्करांशी सामना याचाही समावेश आहे.

tiger3
राष्ट्रीय वाघ संरक्षण विभागाच्या सर्वेक्षणात भारतातील वाघांची संख्या ३० टक्कयांनी वाढून २२२६ वर गेल्याचे दिसून आले आहे. आम्ही करत असलेल्या या कामाबद्दल आम्हाला स्पेशल टायगर अॅवॉर्ड- सँक्च्युअरी आशिया २०१४ पुरस्काराने सन्मानितही केले आहे. फुले सांगतात या भटकंतीत आम्ही अनेकांना सामोरे जात असतो मात्र प्रथमच वाघ समोर आला तेव्हा थोडे गोंधळायला झाले पण बिचारा आमची गँग पाहून पळून गेला. तुम्ही लोक पैसे खर्च करून वाघ पाहायला येता आम्हाला हा आनंद जंगल भटकंतीतून फुकटात मिळतो शिवाय त्यासाठी सरकार पैसे देते ते वेगळे. अर्थात जंगलातील प्राण्यांचे व जंगलसंपदेचे संरक्षण आपल्याकडून होत आहे या समाधानाचा आनंद पैशात मोजता येणार नाही हेही तितकेच खरे.

Leave a Comment