डाळींब परिषदेचा संदेश

dalimb
जळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय डाळींब परिषदेमध्ये डाळिंबाच्या उत्पादनापासून समृध्दी कशी साध्य करता येईल यावर विचार करण्यात आला. डाळींब या एका पिकासाठी शेतकरी एवढे तयार होतील, त्यांची संघटना बांधली जाईल एवढेच नव्हे तर केवळ डाळींब या एका पिकावर एक परिषद घेतली जाईल हे काही वर्षापूर्वी शक्यसुध्दा वाटत नव्हते. परंतु आता ती गोष्ट प्रत्यक्षात आली असून आपले या दिशेने निश्‍चितच निर्णायक पाऊल पडलेले आहे. हे लक्षात येते. या परिषदेमध्ये माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलेल्या भाषणाला सर्वाधिक महत्त्व आले. कारण त्यांनी डाळिंबाच्या उत्पादकतेवर, डाळिंबाच्या उत्पादनाच्या दर्जावर आणि प्रक्रिया उद्योगासहीत निर्यातीवर भर दिला. यातल्या प्रत्येक घटकाचा गांभिर्याने विचार केला तर डाळिंबाच्या उत्पादनात आपण जगात सर्व दृष्टींनी आघाडीवर राहू शकतो आणि डाळींब हे आपल्या समृध्दीचे साधन बनू शकते. कारण डाळिंबाच्या उत्पादनाच्या बाबतीत भारताचा जगात पहिला क्रमांक आहे. भारताच्या खालोखाल इराणमध्ये डाळिंबाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. परंतु भारताचा क्रमांक अजूनतरी इराणला गाठता आलेला नाही.

भारतातले डाळिंबाचे उत्पादन एकरामध्ये प्रचंड असले तरी दर हेक्टरी किती उत्पादन व्हावे याबाबतीत इराण आपल्या पुढे आहे. कारण आपल्या देशात डाळिंबाची शेती भरपूर केली जाते मात्र एका एकरात अधिकाधिक डाळींब उत्पादन व्हावे याबाबत आपण अजून म्हणावे तेवढे जागरूक नाही. अर्थात ही गोष्ट फक्त डाळींबालाच लागू आहे असे नाही. गहू, भुईमूग, तांदूळ किंवा अन्य कोणत्याही कृषी मालाच्या बाबतीत अगदी कापसाच्या बाबतीतसुध्दा आपली अशीच अवस्था आहे. आपल्या देशात ही सारी उत्पादने मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. पण दर एकरी उत्पादनाच्या बाबतीत म्हणजेच उत्पादकतेच्या बाबतीत आपण या सगळ्या पिकांच्या बाबतीत मागे आहोत. पिकाचे प्रमाण जसे कमी आहे तसेच पिकाचा दर्जासुध्दा म्हणावा तसा नाही. त्यामुळे आपण उत्पादन खूप काढूनसुध्दा त्यातले फार कमी उत्पादन परदेशात निर्यात होते. डाळिंबाचे एकंदर देशांतर्गत उत्पादन काही लाख टनांमध्ये आहे. परंतु त्या डाळिंबाचा दर्जा निर्यातयोग्य नसल्यामुळे आपण केवळ ३५ हजार टन डाळिंब निर्यात करू शकतो हे डाळींब आपल्या एकूण उत्पादनाच्या दहा टक्केसुध्दा नाही. म्हणजे आपल्या एकूण उत्पादनापैकी ९० टक्के उत्पादन आपण देशांतर्गत बाजारामध्ये कमी किंमतीला विकून टाकतो. हेच उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात परदेशात पाठवले तर त्यापासून काही पट जादा उत्पन्न मिळू शकते.

आपल्या देशात जे डाळींब दहा रुपयाला विकले जाते तेच डाळींब अमेरिका, जर्मनी किंवा कोणत्याही अरब देशात निर्यात केले तर त्याला दसपट जादा किंमत येते. देशभरामध्ये सव्वा लाख हेक्टर जमिनीवर डाळिंबाचे पीक घेतले जाते. त्यापैकी ९५ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. म्हणजे डाळिंबाच्या उत्पादनात महाराष्ट्र किती पुढे आहे हे लक्षात येेते. परंतु एवढ्या मोठ्या क्षेत्रावर घेतले जाणारे डाळिंबाचे उत्पादन निर्यातयोग्य नसल्यामुळे आपण करोडो रुपयांच्या उत्पन्नाला मुकत आहोत याची जाणीव होते. म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकर्‍यांनी डाळिंबाची अधिकाधिक निर्यात करण्याचा निर्धार केला तर त्यातून महाराष्ट्राला काही अब्ज डॉलर्स सहजपणे मिळू शकतात. अमेरिका, कतार, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, हॉलंड, बेल्जियम, कुवेत, बहारीन इत्यादी संपन्न देशातून महाराष्ट्रातल्या डाळिंबाला मागणी आहे आणि इथले डाळिंबाचे ग्राहक महाराष्ट्राच्या डाळिंबासाठी वाट्टेल ती किंमत द्यायला तयार आहेत. परंतु आपण त्यांचा दर्जा सांभाळत नाही.

खरे म्हणजे महाराष्ट्राला हे सहज शक्य आहे. कारण डाळिंबावर संशोधन करणारे केंद्र सरकारचे डाळींब संशोधन केंद्र महाराष्ट्रातच सोलापूर येथे आहे. परंतु डाळिंबाची चांगली निर्मिती करण्याच्या बाबतीत महाराष्ट्रातले शेतकरी म्हणावे तेवढे जागरूक नाहीत. त्यामुळे आपण मागे पडत आहोत. खरे म्हणजे डाळिंबाचे पीक महाराष्ट्रासाठी आदर्श आहे. महाराष्ट्राला दुष्काळाला खूपदा तोंड द्यावे लागते आणि दुष्काळी परिस्थितीतील सर्वात चांगले आणि भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. कारण डाळिंबाला पाणी कमी लागते. ते दुष्काळी भागातले आदर्श फळपीक आहे. एखाद्या वर्षी डाळिंबाला पाणीच मिळाले नाही आणि त्याची बाग जळून गेली तरीही दुसर्‍या वर्षी पाऊस पडल्यानंतर त्याच बागेला फुटवे यायला लागतात. डाळिंबाची ही क्षमता महाराष्ट्रासाठी तरी आदर्शवत आहे. म्हणून महाराष्ट्राने डाळिंबाकडे अधिकाधिक लक्ष दिले पाहिजे आणि विशेषतः डाळींब निर्यातीवर भर दिला पाहिजे. महाराष्ट्रात सोलापूर, नगर, पुणे, सातारा, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये डाळिंबाच्या बागा मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्या डाळिंबाच्या बागा लावणार्‍या शेतकर्‍यांना डाळींब पिकाचे तंत्र आणि डाळिंबाची व्यापारी लागवड कशी करावी याचे मार्गदर्शन मिळाले पाहिजे. तरच या दुष्काळी पट्ट्यामध्ये निदान डाळिंबामुळे तरी समृध्दीचे दर्शन घडू शकेल.

Leave a Comment