मॅग्नेशियम कमतरता

food
आपल्या शरीरामध्ये प्रथिने, कर्बोेदके आणि स्निग्ध पदार्थ यांचा योग्य समतोल राखला जातो की नाही यावर आपण लक्ष ठेवत असतोच. परंतु त्याशिवाय काही सूक्ष्म पोषक द्रव्यांवरही लक्ष ठेवण्याची गरज असते. शरीराला जसे वरील तीन पोषक द्रव्ये आवश्यक असतात तशीच लोह, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि सोडीयम याही पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. परंतु ही पोषक द्रव्ये फार सूक्ष्म प्रमाणात आवश्यक असतात. त्यामुळे ती मिळतात की नाही आणि मिळत नसतील तर किती कमी पडतात याचे मोजमाप कोणी करत बसत नाही. काही पोषक अन्नामधून ही सूक्ष्म पोषक द्रव्ये आपोआप मिळून जात असतात. ती जशी आपोआप मिळतात तशी आपल्या नकळत कमीही होतात.

विशेषतः नियमित व्यायाम करणारे, दररोज खेळणारे आणि काबाडकष्ट करणारे लोक खूप कष्ट करत असल्यामुळे त्यांच्या घामातून मॅग्नेशियम निघून जाते. त्यावर कोणाचे लक्ष नसते. परंतु मॅग्नेशियम सारखे अगदी नाममात्र आवश्यक असलेले द्रव्य कमी पडले तर त्याचे दुष्परिणाम मात्र भारी होतात. विशेषतः डोके दुखणे, खाण्यावरची वासना उडणे, काही वेळा मधूमेह होण्याकडे प्रवृत्ती होणे असे गंभीर परिणाम या अभावातून निर्माण होतात. त्यावर अनेक प्रकारची औषधे घेतली जातात. परंतु हे सारे दोष मॅग्नेशियम सारख्या एका अतीशय दुर्लक्षित सूक्ष्म पोषण द्रव्यांमुळे निर्माण झाले आहेत याकडे कोणाचे लक्ष नसते.

मॅग्नेशियम कमी होण्याची चाचणीसुध्दा अवघड असते. त्यामुळे कोणत्याही निमित्ताने घाम जास्त येणार्‍या लोकांनी आपल्या शरीरातील मॅग्नेशियम निघून जाऊन काही दोष निर्माण होऊ नयेत यासाठी मॅग्नेशियमयुक्त अन्न जाणीवपूर्वक आणि लक्ष देऊन ग्रहण केले पाहिजेत. अर्थात ही गोष्ट फार अवघड नाही. कोणत्याही द्विदल धान्यातून, मटकीच्या उसळीतून, विशेषतः बदामातून मॅग्नेशियम विपुल प्रमाणात मिळत असते. काही प्रकारच्या माशांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणावर असते. याउपरही मॅग्नेशियम पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसेल तर तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केवळ मॅग्नेशियमचा पुरवठा करणारे औषधे घेतली पाहिजेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment