सहा महिन्यात ४ जी स्मार्टफोनच्या किमती तीन हजारांनी घटल्या

mobile
नवी दिल्ली – ४जी स्मार्टफोनच्या किमतीमध्ये गेल्या काही महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणामध्ये घट झाली असून कोटक इन्स्टीटय़ूट इक्विटीकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालामध्ये बाजारामध्ये सध्या १५ स्मार्टफोन मॉडेल अशी आहेत की ज्यांची किंमत पाच हजार रुपये अथवा त्यापेक्षा कमी आहे. आता ४जी स्मार्टफोन चार हजारामध्येही खरेदी करता येऊ शकतो असे म्हणण्यात आले आहे. गेल्या सहा महिन्यापूर्वी अशा स्मार्टफोनची किमान किंमत सात हजारापर्यंत होती.

देशामध्ये चार हजारापर्यंत स्मार्टफोन खरेदी करता येऊ शकतो. अशा फोनमध्ये चांगल्या सुविधा असतात. पाच इंचाचा डिस्प्ले, १.१ गिगाहर्ट्स क्वाड कोअर प्रोसेसर, ८ जीबी इंटर्नल मेमरी, पाच मेगाफिक्सल कॅमेरा आणि २३०० एमएएच बॅटरी अशा सुविधा देण्यात येत आहेत. सहा महिन्यामध्ये अशा किमान सुविधा असणाऱया स्मार्टफोनची सर्वात कमी किंमत सात हजार रुपये होती. देशामध्ये स्मार्टफोनच्या वापरामध्ये मोठय़ा संख्येने वाढ होत आहे. देशी उत्पादक कंपन्या आणि चीनच्या स्मार्टफोन कंपन्या यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरू असल्याने देशातील स्मार्टफोनच्या किमतीमध्ये घट झाली आहे. सध्या बाजारामध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक स्मार्टफोन वापरात असल्याचे अहवालामध्ये म्हणण्यात आले आहे.

Leave a Comment