रेमिटन्स मनीमध्ये भारतीय आघाडीवर

pardesh-paisa
रेमिटन्स मनी म्हणजे परदेशातून मायदेशी पाठविला जाणारा पैसा. जागतिक बँकेच्या अहवालानुसार असा पैसा परदेशातून मायभूमीत पाठविणार्‍यांत भारतीय जगात आघाडीवर आहेत. २०१५ मध्ये भारतीयांनी रेमिटन्स मनीच्या स्वरूपात सर्वाधिक रक्कम मायदेशात पाठविली आहे मात्र तरीही गतवर्षीच्या तुलनेत ती १ अब्जांनी कमी आहे. २००९ नंतर प्रथमच ही घट झाली आहे.

जागतिक बँकेच्या अहवालानुसार भारतीयांनी २०१५ मध्ये ६९ अब्ज डॉलर्सची रक्कम रेमिटन्स मनी स्वरूपात मायदेशात पाठविली आहे. अन्य देशांच्या तुलनेत ही रक्कम सर्वाधिक आहे. अन्य देशात चीन ६४ अब्ज डॉलर्स, फिलिपिन्स २८ अब्ज, मेक्सिको २५ अब्ज व नायजेरिया २१ अब्ज असा क्रम आहे. जागतिक आर्थिक संकटानंतर हे प्रमाण यंदाच्या वर्षात घटले असल्याचे अहवालात नमूद केले गेले आहे. हे प्रमाण घटण्यामागे तेलदरातील घरसणीमुळे खाडी देशातून मायदेशी पाठविण्यात येणार्‍या रकमा घटल्या आहेत तसेच कॅनेडियन डॉलर, युरो व ऑस्ट्रेलियन डॉलरचे अमेरिकी डॉलरच्या तुलनेत घटलेले दर हेही कारण त्यामागे आहे. विशेष म्हणजे भूकंपानंतर नेपाळात येणारा रेमिटन्स मनी वाढला आहे.

जागतिक बँकेचे ग्लोबल इंडिकेटर ग्रुपचे संचालक ऑगस्टो क्लारोस म्हणाले, रेमिटन्स मनी हा लाखो कुटुंबाच्या कमाईचा स्थायी स्त्रोत असतो तसेच विकसनदेशातील विनियम दरांसाठीही तो महत्त्वपूर्ण असतो. त्याची गती कमी होणे म्हणजे जगातील गरीब कुटुंबांपुढे अडचणी निर्माण होणे असते.

Leave a Comment