दक्षिण भारतातील महाबलीपुरम येथे जाणार असाल तर तेथे प्रचंड खडकावर ४५ डिग्री उताराच्या कोनात लटकलेली महाप्रचंड शिळा पाहायला विसरू नका. यामागे रहस्य वैज्ञानिकांना अजूनही उलगडले नसून स्थानिकांच्या मते भगवानाने आपली ताकद दाखविण्यासाठी ही शिळा ठेवली आहे तर कांही जणांच्या मते हा परग्रहवासियांचा कारनामा आहे. या शिळेला कृष्णाचा लोण्याचा गोळा असेही म्हटले जाते.
रहस्यमयरित्या लटकलेली महाबलीपुरमची शिळा
गेली १३०० वर्षे ही महाप्रचंड शिळा प्रचंड खडकाच्या उतारावर स्थिर आहे. या शिळेचे वजन आहे २५० टन म्हणजे २ लाख५० हजार किलो. कधीही गडगडत खाली येईल अशी भीती येथे प्रथमच येणार्या पर्यटकांना वाटते. असेही सांगितले जाते की १९०८ साली चेन्नईला गर्व्हनर म्हणून आलेल्या आर्थर लॅरी यांनी सात हत्तींच्या मदतीने ही शिळा ढकलण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही.
भूवैज्ञानिकांच्या मते हे नैसर्गिक फॉर्मशन आहे. मात्र तरीही इतक्या उतारावरून ही शिळा घरंगळत कशी नाही याचे उत्तर त्यांच्याकडे नाही. २० फूट उंचीची ही शिळा गुरूत्वाकर्षणाच्या नियमांना आव्हान देत लटकली आहे. मात्र येथे येणारे पर्यटक अगदी निवांत या शिळेखाली बसून फोटो काढण्याचा आनंद लुटतात.