ओहियोतील डॉक्टरची कामगिरी; मेंदूत चिप बसवून लकव्यावर उपाय

ohio
ओहियो (अमेरिका) – २४ वर्षीय इयान बरखर्टला २०१० मध्ये एका अपघातात लकवा झाला. मानेच्या खालील शरीराचा भागच यामुळे निकामी झाला. एखाद्या पुतळ्यासारखे त्याचे आयुष्य झाले होते. मात्र, आता तो बदलला आहे. डॉक्टरांनी त्याच्या मेंदूत एक चिप बसवून त्याला नवे जीवन दिले.

तो अशाच पंगू अवस्थेत मागील सहा वर्षे होता. मात्र, त्याच्या मेंदूत चिप बसवल्यानंतर त्याने जेव्हा चक्क गिटार वाजवली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद अफलातून होता. आता बरखर्ट स्वत:ची कामे स्वत:च करतो. आपल्याला नवजीवन देणाऱ्या डॉक्टरांचे त्याने आभार मानले. न्यूरो लाइफ नावाचे हे उपकरण आहे. अपघातात मानेखालील भाग पंगू झाला असला तरी त्याचा मेंदू मात्र शाबूत होता. यावर डॉक्टरांनी त्याच्या मेंदूवर बायपास शस्त्रक्रिया करून एक सूक्ष्म चिप त्यात जोडली. ही चिप बरखर्टच्या मेंदूतील लहरी वाचून जवळच्या संगणकाकडे पाठवते. या लहरींचे डिकोडिंग होऊन बरखर्टच्या हातावर लावलेल्या बेल्टमध्ये संदेश पाठवले जातात. हा संदेश मिळताच हातांची हालचाल सुरू होते. या चिपमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान आजवर रोबोटिक अवयवांसाठी उपयोगात आणले जात होते.

डबलिनचे रहिवासी बरखर्ट व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. नॉर्थ कॅरोलिना सागरात सूर मारताना अपघात झाला आणि त्यांना लकवा झाला होता. बरखर्ट म्हणतात, कित्येक वर्षांनंतर मी हात हलवू शकत आहे. ही जादू पाहता आगामी काळात हे तंत्रज्ञान आणखी प्रगत होऊ शकेल. हे तंत्रज्ञान शोधून काढणारे जेरी मॅसियू म्हणतात, यामुळे आगामी काळात जगातील लाखो लोकांना नवजीवन मिळू शकेल.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment