वॉशिंग्टन: आगामी आर्थिक वर्षात व्यक्तिगत क्रयशक्ती आणि औद्योगिक क्षेत्रात भारताचा आलेख उंचावत राहणार असून साडेसात टक्क्यांचा विकासदर गाठण्याचे लक्ष्य भारत सध्या करू शकेल; असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
भारताची अर्थव्यवस्था जोरात: नाणेनिधीचा अंदाज
नाणेनिधीने भारतीय अर्थव्यवस्थेबाबत ऑक्टोबरमधील आपल्या अहवालात व्यक्त केलेले अंदाज कायम ठेवले आहेत. औद्योगिक क्षेत्रात वाढ, व्यक्तिगत गुंतवणुकीला प्रोत्साहनातून वृद्धी या सकारात्मक बाबींबरोबरच अनियमित पर्जन्यमानासारख्या अडथळ्यांमुळे महागाईचा दरही प्रमाणाबाहेर वाढण्याची भीती अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
भारत सन २०१७ च्या पहिल्या सहामाहीत चलनवाढ ५ टक्क्यापर्यंत रोखण्यात यशस्वी ठरू शकेल. त्यासाठी अनुकूल परिस्थिती असणार आहे. मात्र बेभरवशाचा पाऊस आणि वेतनवाढ यामुळे वाढत्या महागाईचा धोकाही कायम राहणार आहे; असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
जागतिक विकासदर सन २०१७ मध्ये साडेतीन टक्के राहील;असा नाणेनिधीचा अंदाज आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात जागतिक विकासदर ३.६ टक्के राहील; असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र या अहवालात तो १ टक्क्याने घटविण्यात आला आहे.