संवाद कौशल्याची गरज

talklng-skill
माणसाच्या व्यक्तिमत्त्व विकासामध्ये तणावाचे व्यवस्थापन, वेळेचे व्यवस्थापन यांचे जसे महत्त्व असते तसे संवाद कौशल्याचे महत्त्व असते. विशेषतः राजकारणामध्ये गोड बोलणारा माणूस यशस्वी होतो. ज्याच्या जिभेवर खडीसाखर असते तो राजकारणात पुढे जातो आणि जो नेहमी मस्तीत बोलतो आणि लोकांचा उपमर्द करून बोलतो तो राजकारणात नेहमीच अडचणीत येतो. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे संवाद कौशल्य याबाबतीत अफलातून होते. सध्या कॉंग्रेसची सद्दी सुरू नसली तरी सुशीलकुमार शिंदे हे नेते सतत राजकारणात वर चढत गेलेले दिसतात. न्यायालयात शिपायाची नोकरी करणारे शिंदे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, खासदार आणि शेवटी केंद्रीय गृहमंत्री झाले. त्यांच्या परिस्थितीचा फार तपशीलात आढावा घेण्याची गरज नाही. परंतु त्यांच्या या विकासामध्ये त्यांचे संवाद कौशल्य हे सर्वाधिक उपयोगी पडलेले आहे.

शिवाजी महाराजांचे संवाद कौशल्य फार जबरदस्त होते. असे अनेकदा सांगितले जाते. त्याचाही अभ्यास होण्याची गरज आहे. संत रामदास स्वामींनी याचे महत्त्व ओळखलेले होते. म्हणून ते म्हणत असत,
अरे म्हणता कारे येते
बोलल्यासारखे उत्तर येते |
मग कठोर बोलावे
ते काय कारणे ॥
आपण लोकांना ज्या शब्दात बोलू त्या शब्दात त्यांच्याकडून उत्तर येते. कधी कधी ते ताबडतोब येत नाही. परंतु शब्दाने दुखावला गेलेला माणूस पुढे आयुष्यात कधी तरी त्या शब्दाची परतफेड कोणत्याही प्रकारे केल्याशिवाय राहत नाही. सध्या छगन भुजबळ अडचणीत आहेत. त्यामागे हेच कारण आहे. त्यांनी हातात सत्ता असताना अनेकांना दुखावले. ते सतत गुर्मीत बोलत असत. त्यांनी दुखावलेल्या लोकांनीच त्यांना अडचणीत आणले आहे असे अनेक पत्रकारांचे म्हणणे आहे.

सध्या अजितदादा पवार यांच्याबाबत एक हकीकत चर्चिली जात आहे. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि फडणवीस सरकार आपल्यामागे का लागले आहे असा सवाल त्यांना केला. तेव्हा फडणवीस यांनी हात वर केले आणि अजित पवार यांच्या मागे लागलेला ससेमिरा आपल्यामुळे नसून आर. आर. पाटील यांच्यामुळे आहे असे सांगितले. त्या संबंधातली फाईलसुध्दा फडणवीस यांनी अजितदादा यांना दाखवली आणि ती पाहिल्यानंतर अजित पवार यांनी कपाळावर हात मारून घेतला. अशी एक बातमी काही वृत्तपत्रात प्रसिध्द झाली आहे. आर. आर. पाटील यांनी कारवाईचा आग्रह धरला आणि गृहमंत्री या नात्याने केवळ अजित पवारच नव्हे तर छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादीच्या सोळा नेत्यांची भ्रष्टाचार प्रतिबंधक कारवाईखाली चौकशी करण्याची मागणी करणारी फाईल नरेंद्र मोदी यांच्याकडे पाठवली.

हे सगळे ऐकले म्हणजे माणसाचे बोलणे त्याला किती महागात पडते याचे प्रत्यंतर येते. मागे एकदा जाहीर सभेमध्ये बोलताना अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांचा भर सभेत तंबाखू खाण्यावरून अपमान केला होता. एवढेच नव्हे तर आपण स्वतः कसे हजारोंच्या मताधिक्क्याने निवडून येतो आणि आर. आर. पाटलांना मात्र २-३ हजारांच्या लीडसाठी किती आटापिटा करावा लागतो असे म्हणून त्यांचा पाणउतारा केला होता. त्यावर आर. आर. पाटलांनी थेट शरद पवार यांच्याकडे तक्रार केली खरी परंतु हा अपमान आणि सल त्यांच्या मनामध्ये नक्कीच ठसठसत राहिलेला असला पाहिजे आणि त्यापोटीच त्यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा वापर करून अजित पवार यांनी केलेल्या अपमानाचा बदला घेतला असला पाहिजे. राजकारणात बोलताना कसे सावध राहिले पाहिजे याचा हा धडाच आहे.

राजकारणातले काही नेते हाती सत्ता येताच मग्रूर होतात आणि बड्या बड्या लोकांचा सतत अपमान करत राहतात. लोकांशी अतीशय ताठ्याने वागतात. ताठ्याने बोलतात. पण सत्ता ही कायम राहत नसते. हे त्यांच्या लक्षात येत नाही. सत्ता जाताच ते उघडे पडतात आणि मग एखादा दुखावलेला माणूस त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन कधीतरी डंख मारतो. तेव्हा सत्तेवर असताना लोकांशी इतक्या नम्रपणे बोलले पाहिजे आणि लोकांची एवढी कामे केली पाहिजेत की सत्तेवर गेल्यानंतरसुध्दा लोकांनी त्यांचा आदरच केला पाहिजे. राजकारणात हे सर्वांनाच जमत नाही परंतु ज्यांना जमते त्यांच्याविषयी आपण किती चांगले ऐकतो. ते सत्तेवरून गेले तरी सर्वत्र त्यांचे मित्र असतात आणि त्यांची कामे होतच राहतात.

Leave a Comment