नवी दिल्ली : आताच्या जमान्यात शोधूनही ज्याच्याकडे स्मार्टफोन नाही असा एकही जण सापडणार नाही आहे. आजकाल दररोज प्रत्येकजण आपल्या मित्र-मैत्रिणींना व्हॉट्सअपवरून संदेश, ऑडिओ-व्हीडिओ, फोटो शेअर करतो. मात्र, अशी स्थिती असताना भारतात व्हॉट्सअपवर बंदी येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे व्हॉट्सअपने आणलेले नवीन एन्क्रिप्शन तंत्रज्ञान होय. हे तंत्रज्ञान भारतीय दुरसंचार नियमांच्या विरूद्ध असल्याने असे होण्याची शक्यता आहे.
भारतात व्हॉट्सअपवर बंदी येण्याची शक्यता!
व्हॉट्सअपमध्ये वापरकर्ते ४०-बीट एन्क्रिप्शन वापरू शकतात, पण आता हे वाढवून २५६-बीट करण्यात आले आहे. त्यामुळे जे लोक भारतात व्हाट्सअपचा वापर करतात त्यांच्यासाठी हे बेकायदेशीर आहे. ज्यांना या एन्क्रिप्शन प्रणालीचा वापर करायचा आहे, त्यांना त्यासाठी आधी सरकारकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.
भारतात जे लोक व्हॉट्सअपचे नवीन अपडेटेड व्हर्जन वापरत आहेत, ते बेकायदेशीररित्या याचा वापर करत आहेत. जर व्हॉट्सअपला भारतात हे उच्च एन्क्रिप्शन तंत्रज्ञान वापरायचे असेल, तर कंपनीला देखील सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. प्राप्त माहितीनूसार, सरकारने आतापर्यंत यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
भारतीय एन्क्रिप्शन नियमांनूसार ओटीटी सेवा एन्क्रिप्शन नियमावलीत येत नाही, जसे इतर दुरसंचार कंपन्या येतात. परंतू केंद्र सरकार आता भारतात नवीन एन्क्रिप्शन नियमावली लागू करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे नव्या नियमावलीनंतर व्हॉट्सअप देखील याच्या कक्षेत येईल किंवा त्यावर बंदी घातली जाईल.