नासाच्या केप्लर अवकाशयानात बिघाड

nasa-keplar
वॉशिंग्टन : पृथ्वीसारख्या अनेक बाह्यग्रहांचा शोध घेणारे केप्लर अवकाशयान आता आपत्कालीन स्थितीत गेले असून ते सध्या पृथ्वीपासून ७.५० कोटी मैल अतंरावर आहे, असे अमेरिकेच्या नासा या अवकाश संशोधन संस्थेने म्हटले आहे. पृथ्वीशी संपर्क मंदावल्याने केप्लर यानाची दुरुस्ती करणे हे आता नासाच्या अभियंत्यांपुढचे मोठे आव्हान आहे. यानाचा ९ एप्रिलला संपर्क झाला तेव्हा केप्लर यान आपत्कालीन स्थितीत गेल्याचे अभियंत्यांच्या निदर्शनास आले होते.

या अवस्थेत यानाची संचालन स्थिती अवघड असते व इंधनही संपत आलेले असते. प्रारंभीच्या अंदाजानुसार केप्लर यान आकाशगंगेच्या मध्याकडे वळवण्याच्या पूर्वी आपत्कालीन अवस्थेत गेले आहे. गुरुत्वीयभिग तंत्राने ग्रह शोधून काढण्याची मोहीम यानाच्या माध्यमातून राबवली गेली होती. आता त्याच्याकडून येणारे संदेश क्षीण झाले आहेत. प्रकाशाच्या वेगाने विचार केला तरी संदेश मिळण्यास १३ मिनिटे लागत आहेत. ४ एप्रिलला यानाचा शेवटचा सुरळीत संपर्क झाला होता असे असले तरी त्यावेळी यान व्यवस्थित काम करीत होते.

तरुण तारे, अतिनवतारे व इतर खगोलीय घटकांचा अभ्यास हे यान करीत असतानाच त्यात विघ्न निर्माण झाले आहे. केप्लर अंतराळ यान म्हणजे पृथ्वीसारखे वसाहतयोग्य बाह्यग्रह शोधणे, आकाशगंगेचे सर्वेक्षण करणे यासाठी सोडलेली दुर्बीण असून तिच्यात २०१२ मध्येही बिघाड झाला होता त्यावेळी समतोल राखणारे चाक निखळले होते. २००९ मध्ये ही दुर्बीण अवकाशात सोडण्यात आली होती. त्याने शोधलेल्या पाच हजार पैकी एक हजार बाह्यग्रहांची निश्चिती झाली आहे. केप्लर यानाने २०१२ मध्ये के-२ मोहिमेत पाच हजार बाह्यग्रह शोधले होते. यापुढेही बाह्यग्रहांचा शोध चालूच होता.

Leave a Comment