गुगलची मालकी असलेल्या अल्फाबेट ने दोन पायांचा रोबो तयार केला असून हा रोबो जपान मध्ये होत असलेल्या २०१६ न्यू इकॉनॉमिक समीटमध्ये सादर केला जाणार आहे. अल्फाबेटच्या अधिपत्याखाली असलेल्या शाफट रोबोटिक लॅबमध्ये या रोबोची निर्मिती केली गेली आहे. ही लॅब टोक्यो विद्यापीठाने स्थापन केलेली आहे. अल्फाबेटने त्यांची रोबोटिक्स फर्म बॉस्टन डायनॅमिकच्या विक्रीची तयारी केली असल्याचे सांगितले जात असले तरीही अल्फाबेटच्या मालकीच्या असलेल्या अन्य रोबो फर्ममध्ये रोबोंची निर्मिती सुरूच राहणार असल्याचे समजते.
गुगलचा दोन पायांचा रोबो
शाफ्ट लॅबमध्ये तयार झालेला हा रोबो फारसा आकर्षक नाही अथवा त्यात तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही खूप नवीन कांही नाही मात्र तो जिने चढणे, उतरणे, कोणत्याही खडकाळ पृष्ठभागावर तोल जाऊ न देता चालणे व त्याचवेळी ६० किलो वजनापर्यंतचे सामान वाहून नेणे ही कामे करू शकतो. रोबो साठी जिने चढणे उतरणे हे अवघड काम मानले जाते. या रोबोला आर्टिफिशियल इंटेलिजन्सही नाही. मात्र इंजिनिअर्स चालण्याची, जिने चढउतार करण्याची व सामान वाहून नेण्याची क्षमता असलले रोबो बनवत आहेत याचे हे उदाहरण मानले जात आहे.