बायांनो, तुमच्याच लाडांनी बिघडतात नवरे

husband
पुरूष घरात कितीही बेफिकीरी दाखवत असले तरी बहुतेक कामांसाठी ते बायकांवर अवलंबून असतात हे उघड गुपित आहे. बायका आपले नवरे घरात कसे बेशिस्त वागतात व त्यामुळे घरादाराची सारी जबाबदारी त्यांच्यावरच कशी पडते अशी आरडाओरड कितीही करत असल्या तरी या नवरोबांच्या त्रासदायक सवयी बायकांनी केलेल्या लाडांमुळेच त्यांच्या अंगी भिनतात हे मात्र त्रिकालाबाधित सत्य आहे.

घरातली सकाळच मुळी नवरोबांना बेड टी देण्यापासून या बायका करतात. त्यांचा हा अतिउत्साह नवरोबा एन्जॉय करतात व कालांतराने बेड टी देणे ही प्रथाच पडून जाते. ही यादी फक्त बेडटी पर्यंतच मर्यादित राहात नाही. आणि मग रिलेशनशीपमध्ये तणाव निर्माण होऊ लागतात. त्यामुळे नवरोबांना नाही त्या सवयी लागू नयेत याची काळजी महिलावर्गाने सुरवातीपासूनच घेणे गरजेचे आहे. जेणेकरून घराची जबाबदारी विभागली जाईल.
wardrobe

नवरा या जमातीला सकाळच्या बेड टी पासून ते रात्री झोपेपर्यंत पार्टनर हवा असतो. हा पार्टनर म्हणजे बायकोच असल्याने नवरोबांच्या सवयी झटपट बदलत जातात. घाणेरडे बूट, मोजे घरभर कुठेही ठेवणे, मळके कपडे वेळेवर धुवायला न टाकणे, ओले टॉवेल बेडवर टाकणे, टिव्हीचा रिमोट हाताला येईल तेथे ठेवणे, कुशन्स कुठेही फेकणे, चहा प्यायलेले कप बसल्या जागी ठेवणे, स्वतःचे कपड्याचे कपाट अस्ताव्यस्त ठेवणे अशी ही यादी वाढत जाते. मात्र यामागे कारण ठरतात त्या बायकाच. सुरवातीपासूनच घरातला पसारा आवरणे हे आपलेच काम आहे या भावनेने त्या हे पसारे आवरत जातात व मग घराला तीच पद्धत लागते.

त्यात भर पडत जाते ते नवर्‍यांच्या केवळ बायकोचाच नाही तर घरातल्या कुणाचाही वाढदिवस लक्षात न ठेवणे, ऑफिससाठी जातानाचे कपडे अगोदरच न काढता ऐनवेळी कपाट उपसून हवे तितके कपडे बाहेर काढणे व त्यातला एक अंगात घातल्यावर बाकीचे तसेच फेकणे, कामाच्या वस्तूंसाठी म्हणजे किल्ल्या, फोन, रुमाल, पाकिट शोधून देण्यासाठी वरचेवर बायकोच्या नावाचा पुकारा करणे असल्या संतापजनक सवयींची. पुरूषांच्या दिवसाची सुरवातच मुळी शोधाशोधीने होते. बायकांच्या अति लाडामुळे डोळ्यासमोर असलेल्या वस्तूही त्यांना दिसेनाशा होतात.
kitchen

अर्थात परिस्थिती फार हाताबाहेर गेली असे समजण्याचे कारण नाही. सुरवातीपासूनच थोडी काळजी घेतली तर बरीच सुधारणा होऊ शकते. उदाहरण द्यायचे तर नवर्‍याचा मूड आज ठीक नाही हे बायकांना न सांगता समजते व त्याला रिलॅक्स करण्यासाठी त्या आवर्जून प्रयत्नही करतात. असले लाड करू नका. तुमचाही मूड नसतो तेव्हा त्यातून तुम्हीच बाहेर पडता तसेच त्यांनाही करू द्या. नवर्‍याला आवडते तसे जेवण बनवून बायका त्यांना आणखीनच लाडोबा करतात. त्याचे आवडते जेवण जरूर बनवा पण त्यालाही स्वयंपाकाची सवय लावा, निदान स्वयंपाकात मदतीची सवय लावाच. स्वतःच्या वस्तू स्वतःच शोधण्याची संधी पुरूषांना द्या. वस्तू हातात देण्याचा अति उत्साह आवरा.

सर्वात महत्वाचे म्हणजे, महिला कमावत्या असतील तर पुरूष आर्थिक टेन्शन घेत नाहीत असा अनुभव आहे. याचा अर्थ घरातले खर्चही बायकाच करत राहतात. त्यामुळे नवर्‍याला घरात पैसे न देण्याची सवय अजिबात लागू देऊ नका. सुपरवुमन कॅरेक्टर करताना त्यातील आव्हाने त्यांना समजू द्या आणि वेळेला दुर्गेचा अवतार धारण करा पण घरातल्या सर्व कामांची सवय त्यांना लावण्याचा निदान प्रयत्न तरी करा.

Leave a Comment