आता हवामानाचे भविष्य वर्तवणार फेसबुक!

facebook
मुंबई : आपल्याकडे सहजासहजी हवामानाचे अंदाज भारतीय हवामान विभाग किंवा स्कायमेट यांच्याकडून वर्तवले जातात आणि या हवामान अंदाजांचा बळीराजाला खूप उपयोग होतो. मात्र आता जगातील प्रसिद्ध सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकही भारतातील हवामानाचा अंदाज व्यक्त करणार आहे. त्यादृष्टीने फेसबुकने पावलेही उचलण्यास सुरुवात केली आहे.

भारतातील काही फेसबुक युजर्सनी जेव्हा फेसबुक अकाऊंट लॉग इन केले, तेव्हा त्यांना हवामानाचा अंदाज वर्तवणारे फीचर दिसले. मात्र, फेसबुकने सगळ्याच युजर्ससाठी हे फीचर खुले केले नसून काही निवडक युजर्सच्या माध्यमातून या फीचरचे टेस्टिंग केले जात आहे. जेव्हा युजर फेसबुक अकाऊंट लॉग इन करेल, तेव्हा फेसबुक होमपेजवर गूड मॉर्निंग, गूड अफ्टरनून किंवा गूड इव्हिनिंग असे युजर्सच्या नावासह मेसेज दिसेल. मात्र, नव्या फीचरचा समावेश केल्यानंतर लोकेशननुसार तापमान किती आहे, हेही सांगितले जाणार आहे. आतापर्यंत हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या या फीचरबाबत फेसबुकने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. कारण हे नवे फीचर युजर्सना किती उपयुक्त असेल, याची माहिती फेसबुककडून घेतली जात आहे. युजर्सना आकर्षित करतील अशा काही फीचर्सचे टेस्टिंग फेसबुककडून करण्यात येत आहे, अशी माहिती फेसबुकच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Leave a Comment