आता ऑनलाईनच होणार सरकारी नोकरभरती

vacancy
नवी दिल्ली : डिजीटल इंडिया योजनेवर केंद्र सरकारने आणखी लक्ष केंद्रित करण्याच्या उद्देशाने सर्व सरकारी विभागांतील नोक-यांसाठी एकच वेब पोर्टल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. या वेब पोर्टलच्या माध्यमातून सर्व विभागातील भरतीसंबंधीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी याच वेब पोर्टलवर अर्ज करावयाचा असून त्यांना नियुक्तीपत्र देखील ऑनलाईनच मिळणार आहे. याबाबत सरकारी अधिका-यांनी दिलेल्या माहितीनूसार कॅबिनेट सचिवालयाने याबाबत सर्व सरकारी विभागातून माहिती घेतली आहे. हा निर्णय येत्या काही महिन्यांत लागू करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक वर्षी जवळजवळ २ लाख पदांची भरती या माध्यमातून करण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रत्येक विभागात अडीच ते तीन कोटी रूपयांची बचत होणार आहे. दरवर्षी अर्ज, माहितीपत्रके छपाई आणि डाक यावर मोठय़ा प्रमाणात खर्च होत असतो, ज्यात आता बचत होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार सर्व सरकारी विभागांना लवकरात लवकर या वेब पोर्टलशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे.

Leave a Comment