आशियातील सर्वात प्रभावी उद्योजिका ठरल्या नीता अंबानी

neeta-ambani
नवी दिल्ली : फोर्ब्सच्या यादीत ‘आशियातील सर्वात प्रभावी महिला उद्योजका‘चा मान रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी यांना मिळाला असून भारतीय उद्योगाच्या ‘फर्स्ट लेडी‘ असेही त्यांना संबोधण्यात आले आहे. आशियातील आघाडीच्या ५० प्रभावी महिला उद्योजकांची यादी फोर्ब्स मासिकाने सादर केली आहे. चीन, इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, व्हिएतनाम, थायलंड, हाँगकाँग, जपान, सिंगापूर, फिलीपाईन्स आणि न्युझीलंडमधील आघाडीच्या महिला उद्योजकांची नावे या यादीत आहेत.

या यादीमध्ये एकूण ८ भारतीय महिला आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एसबीआयच्या प्रमुख अरुंधती भट्टाचार्य या आहेत. अंबिगा धीरज, वेल्सपनच्या सीईओ दिपाली गोयंका, लुपीनच्या सीईओ विनिता गुप्ता, आयसीआयसीआयच्या सीईओ चंदा कोचर, बायोकॉनच्या प्रमुख किरण मुजुमदार शॉ, हेल्थ केअर फाऊंडेशनच्या वंदना लुथरा यांचा या यादीत समावेश आहे. निता अंबानी या संचालिकाही आहेत तसेच रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी प्रशंसनीय काम केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो, असेही फोर्ब्सने म्हटले आहे. भारतीय महिलांचा उद्योग आणि व्यवसायात सहभाग वाढत असल्याची नोंदही फोर्ब्सने घेतली आहे.

Leave a Comment