शिक्षण संस्थांचे मानांकन

education
भारतात परदेशी विद्यापीठांना अनुमती देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. परंतु तशी परदेशातली कोणती विद्यापीठे भारतात आलीच नाहीत. सरकारच्या या निर्णयामागे जगातली नामवंत विद्यापीठे भारतात येतील अशी कल्पना होती. परंतु नामांकित विद्यापीठे फिरकलीच नाहीत. ज्या विद्यापीठांना परदेशात फारशी प्रतिष्ठा नाही अशांनीच भारतामध्ये आपल्या शाखा उघडण्याची अनुमती मागितली. उत्तर प्रदेशात अशी काही विद्यापीठे स्थापितही झाली आहेत. त्या विद्यापीठांचा व्याप आणि दर्जा यांची भारतातल्या विद्यापीठांशी तुलना केली असता त्यात फार मोठे अंतर असल्याचे लक्षात आले. भारतातल्या सर्वोत्कृष्ट विद्यापीठातसुध्दा परदेशातल्या निकृष्ट विद्यापीठाएवढ्या सोयी नाहीत असे बरेचदा आढळून येते.

भारतातली विद्यापीठे आणि शिक्षण संस्था फार सुसज्ज आणि जागतिक दर्जाच्या नसल्या तरी तसा प्रयत्न जारी आहे आणि त्यात ज्या विद्यापीठांनी काही प्रयत्न केलेले आहेत. त्यांना बढावा मिळावा यासाठी केंद्राच्या मनुष्यबळ विकास खात्याने प्रथमच देशातल्या उत्तम शिक्षण संस्था आणि विद्यापीठांची क्रमवारी आणि यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र हे शिक्षण संस्थांच्या क्षेत्रातील अग्रगण्य राज्य असल्याचा दावा आपण करतो खरा पण केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या क्रमवारीमध्ये महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेच्या या दाव्याचा फुगा फुटला आहे. महाराष्ट्राच्या बरोबरीनेच तामिळनाडू, कर्नाटक याही राज्यांनी शिक्षण क्षेत्रात आघाडी घेतल्याचे क्रमवारीत दिसून आले आहे.

महाराष्ट्राच्या वाट्याला या यादीमध्ये काहीच आलेले नाही असे काही नाही. मुंबईची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ही संस्था एकूण गुणवत्ता यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर आहे. मुंबई आयआयटी हीसुध्दा एक चांगली शिक्षण संस्था ठरली आहे. मात्र सर्वोत्तम शिक्षण संस्थेचा मान कर्नाटकातल्या आयआयटी बंगळुरुकडे गेलेला आहे. एकूण जगातल्या शिक्षण संस्थांमध्ये भारतातल्या संस्था नेमक्या कोठे बसतात हे मात्र आपण सांगत नाही. कारण त्या संदर्भात विचार केला असता फारच दयनीय स्थिती दिसते. भारतात जी संस्था सर्वात उत्तम असते तीच जगातल्या क्रमवारीत २०० क्रमांकाच्या पुढे कोठेतरी असते. उदा. भारतातील सर्वोत्तम संस्था इंडियन इन्स्टिट्यूट टेक्नॉलॉजी बंगळुरु या संस्थेचा जागतिक क्रमवारीत ३०० पेक्षा पुढे क्रमांक आहे. तेव्हा आपण आपापसात कितीही नंबर काढून घेतले तरी ते नंबर काढणे हे वासरात लंगडी गाय शहाणी या न्यायाने काढणे असते.

Leave a Comment