बीजिंग : चीनने गुरुत्वाकर्षण आणि अवकाशामधील विविध घटकांचा अभ्यास करण्याच्या उद्देशार्थ एका उपग्रहाचे (डग-१०) प्रक्षेपण केले. या उपग्रहाचे प्रक्षेपण चीनमधील गोबीच्या वाळवंटातील जिऊकान उपग्रहण उड्डाण केंद्रामधून करण्यात आले. हा उपग्रह विशिष्ट काळानंतर पुन्हा पृथ्वीवर परतणार असून या काळात अवकाशात मिळविलेल्या माहितीचे पृथ:करण करणे वैज्ञानिकांना शक्य होणार आहे. अवकाशात असताना या उपग्रहाच्या माध्यमामधून अवकाशातील विविध घटकांची माहिती मिळविण्यासाठी एकूण १९ वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत. या प्रयोगांमध्ये अवकाशात मानवी प्रजननाच्या शक्यतेविषयीची माहिती मिळविण्यासंदर्भातील प्रयोगाचाही समावेश आहे.
महत्त्वपूर्ण ‘विज्ञान उपग्रहा’चे चीनकडून प्रक्षेपण
याचबरोबर, या वैज्ञानिक मोहिमेमध्ये अवकाशामधील किरणोत्साराचाही अभ्यास केला जाणार आहे. या उपग्रहाच्या माध्यमामधून केले जाणारे प्रयोग हे सर्वस्वी नवे असून ते याआधी चीनमध्ये वा परदेशांतही करण्यात आलेले नाहीत, असे मुख्य वैज्ञानिक हु वेनरुई यांनी म्हटले आहे. चीनच्या महत्त्वाकांक्षी वैज्ञानिक उपग्रह कार्यक्रमाच्या माध्यमामधून अवकाशात प्रक्षेपित केला जाणारा हा दुसरा उपग्रह आहे.