जगातील २५टक्के (१० कोटी) मधुमेही भारतात

Daibetes
जागतिक आरोग्य दिन विशेष
नवी दिल्ली: जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूटीओ) यावर्षीच्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘मधुमेहाशी लढू; आयुष्य आरोग्यसंपन्न बनवू’ असा संदेश दिला आहे. या निमित्ताने आरोग्य संघटनेने आपला पहिला मधुमेहविषयक जागतिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालातील आकडेवारी भारताला धोक्याचा कंदील दाखविणारी आहे. जगात सध्या मधुमेहींची संख्या ४२ कोटी असून त्यापैकी तब्बल १० कोटी मधुमेही भारतीय आहेत.

सन १९८० मध्ये जगभरात प्रौढ मधुमेहींची संख्या केवळ १० लाख होती. मात्र त्यानंतर सन २०१४ पर्यंत ही संख्या तब्बल ४२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. मागील काही दशकांपासून मधुमेहींची संख्या वाढण्याचे प्रमाण प्रगत देशांपेक्षा विकसनशील देशात अधिक आहे. सन १९८० च्या दशकात जगाच्या एकूण लोकसंख्येच्या मधुमेहींचे प्रमाण ४.७ टक्के होते; तर सन २०१४ मध्ये हेच प्रमाण दुप्पट; म्हणजे ८.५ टक्के एवढे वाढले आहे.

मधुमेहाच्या वाढत्या प्रमाणाचे प्रमुख कारण हे लोकांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या बदलत्या सवयींमुळे वाढणारा लठ्ठपणा; हे असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. एकेकाळी मधुमेह हा वाढत्या वयातील आजार समाजाला जात असे. मात्र आता वयाच्या २० व्या वर्षापासूनच या विकाराची लागण होण्यास सुरुवात होत असल्याचे निरीक्षणही अहवालात नोंदविण्यात आले आहे. मधुमेहाने मृत्यू होणाऱ्या रुग्णांपैकी ४३ टक्के रुग्णांचा मृत्यू वयाच्या ७० वर्षांपूर्वीच होत असल्याचे मागील काही दशकात दिसून येत आहे.

जगभरात मधुमेहासाठी खर्च होणारी रक्कम ८२७ अरब डॉलर एवढी प्रचंड आहे. मधुमेहींची वाढती संख्या आणि प्रभावी उपचारांसाठी उपलब्ध असलेले अत्याधुनिक तंत्रज्ञान या दोन्हीमुळे मागील दशकात या खर्चात मोठी वाढ झाली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment