एखादा माणूस गैर मार्गाने पैसा कमावतो आणि श्रीमंत होतो. परंतु तो कितीही श्रीमंत झाला तरी त्याला समाजात आदराचे स्थान मिळत नाही. कारण आपल्या समाजामध्ये घाम गाळून पैसे मिळवण्याला अजूनही आदर आहे. सामाजिक जीवनात घामाचे हे महत्त्व तर आहेच. आपल्या आरोग्यातसुध्दा घामाचे महत्त्व अधिक आहे. काही लोकांना घाम येणे हे घातक आहे असे वाटते. तर काही लोकांना घामाचा वास असह्य होतो. परंतु डॉक्टरांच्या मते घाम ही गोष्ट तेवढी वाईट नाही. तो शरीरातला एक स्राव आहे. वातावरणातले तापमान आणि शरीराचे तापमान यांच्यातला समतोल साधण्यासाठी आपले शरीरच घामाची निर्मिती करत असते. त्यामुळे तो एक अपरिहार्य स्राव आहे.
घामाचे मोल जाणा
साधारणतः सक्रिय जीवन जगणारा मध्यमवयीन माणूस दिवसभरात १ लीटर घाम निर्माण करतो. घाम निर्माण झाल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शिवाय घामाच्या निर्मितीमुळे रक्तप्रवाह जोरदार वाहायला लागतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. घामामधून आपल्या शरीरातील अतिरिक्त कॅल्शियम आणि सोडीयम आपल्या शरीराबाहेर फेकले जाते. त्यामुळे मुतखडा होण्याची शक्यता कमी होते. कारण मुतखडा हा विकार अतिरेकी कॅल्शियममुळेच होत असतो. माणसाला जेव्हा घाम येतो तेव्हा तो पाणी पितो किंवा शक्य झाल्यास एखादे पेय पितो आणि त्या पेयांमुळे लघवीतील अशुध्दता कमी होते.
घाम आल्यामुळे शरीराचे वाढलेले तापमान कमी होते. शरीर मर्यादेपेक्षा अधिक तापले की घाम येतो आणि हा घाम त्वचेच्या वरच्या थरावर येऊन वार्याने वाळतो. अशा प्रकारे त्याच्यामुळे शरीराचे तापमान तर नियंत्रणात येतेच परंतु घामाच्या माध्यमातून रक्तातील आणि शरीरातील अनेक विषाक्त पदार्थ शरीराच्या बाहेर फेकले जातात आणि शरीराची कातडी चमकायला लागते. घाम आल्याने माणसाच्या शरीरावरील तसेच मनावरील आणि मेंदूवरीलसुध्दा तणाव कमी होेतो.