चोरी, उचलेगिरीचे प्रशिक्षण देणारी गांवे

robbers
रायपूर- धमतरी पोलिसांनी देशभरातून बँकातून पैसे चोरणार्‍या आंतरराज्यीय टोळीतील २०० पेक्षा अधिक जणांची धरपकड केल्यानंतर त्यांच्याकडून धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. टोळीचा प्रमुख एस. शक्ती हा ऐषोआरामाचे आयुष्य जगत असून त्याने दिलेल्या माहितीनुसार तमीळनाडूच्या त्रिचलापल्ली जिल्ह्यातील रामजीनगर, कल्लीकुडी सोलननगर, मल्लीपट्टी, पुंगनूर ही गांवे या चोरट्यांची माहेरघरे आहेत. इतकेच नव्हे तर येथील बहुसंख्य जनता उचलेगिरीत प्रवीण असून या चोर्‍यांचे शिक्षण त्यांना गावातील ज्येष्ठ चोरट्यांकडूनच दिले जाते. या ट्रेनिगमध्ये पास झाल्यावरच त्यांना गँग मध्ये सामील करून घेतले जाते.

या चोरट्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जेथे चोरी केली जाते तेथे ते क्षणभरही थांबत नाहीत. चोर्‍या, लूटी करण्यासाठी रेल्वे रूळांजवळ असणारी गांवे त्यांना अधिक पसंत पडतात कारण काम साधल्यावर लगोलग रेल्वेने पळ काढता येतो. रायपूर येथे पकडलेल्या गँगने धमतरी येथे बँकेतून १० लाखांची रोकड लांबविली होती. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, बंगालमधील सिलीगुडी येथेही १५ दिवसांत या गँगने लाखोंच्या चोर्‍या केल्याचे उघडकीस आले आहे.

या गँगचे सदस्य वर्षानुवर्षे घराकडे फिरकत नाहीत. कारण पोलिस तपासासाठी आपल्या घराकडे जाणार याची त्यांना खात्री असते. त्यामुळे ही गँग त्यांच्यासोबत धोबी, न्हावी आचारी, झाडू मारणारे अशा कामगारांनाही सोबत ठेवतात. चोरीतील रक्कम समान वाटून घेतली जाते तसेच सदस्यांना पगारही दिला जातो. म्होरक्या शक्ती याने दिलेल्या माहितीनुसार त्यांची गँग बँक ऑफ बरोडाच्या शाखा लूटमार करण्यासाठी प्राधान्याने निवडते कारण तेथे सुरक्षा पुरेशी नसते आणि त्यांचे कौंटर उघडे असतात.

Leave a Comment