टाटा मोटर्सची ‘टिअॅगो’ बाजारपेठेत

Tata-Tiago
नवी दिल्ली: टाटा मोटर्सची अत्याधुनिक ‘टिअॅगो’ ही ‘हॅचबॅक’ श्रेणीतील कार बाजारपेठेत दाखल झाली आहे. पेट्रोल आणि डीझेल इंजिनमध्ये उपलब्ध असणाऱ्या या गाडीची किंमत ३ लाख २० हजारापासून ते ५ लाख ५४ हजार रुपये एवढी आहे. या गाडीला ‘हुंदाई ग्रँड आय १०’ आणि मारुती सुझुकीची ‘सेलेरिओ’ या गाड्यांशी स्पर्धा करावी लागणार आहे.

पेट्रोल इंजिनच्या ‘टिअॅगो’ची किमान किंमत ३ लाख २० हजार; तर सर्वाधिक किंमत ४ लाख ७५ हजार रुपये आहे. डीझेल इंजिनच्या गाडीची किंमत ३ लाख ९४ हजार ते ५ लाख ५४ हजार एवढी आहे. सध्या ‘टिअॅगो’ला पाच मॅन्युअल गिअर्स असून कालांतराने या गाडीचे अॅटोमॅटिक गिअर्स असलेले मॉडेलही बाजारात येण्याची शक्यता आहे.

या गाडीची अंतर्गत आणि बाह्य रचना तिच्या स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांपेक्षा पूर्णपणे वेगळी असून त्यामध्ये मागील बंपर स्पोर्टी आणि रिअर स्पॉईल असून याच्या सर्वात महाग मॉडेलमध्ये १४ इंच रुंदीचे एलॉय टायर बसविण्यात आले आहेत.

‘टिअॅगो’च्या पेट्रोलवरील मॉडेलमध्ये १.२ लीटर ३ सिलेंडर इंजिन, ८५ पीएस क्षमता, सर्वाधिक ११४ एनएम टॉर्क, डीझेलच्या मॉडेलमध्ये १.० लीटर ३ सिलेंडर इंजिन, ७० पीएस क्षमता, सर्वाधिक १४० एनएम टॉर्क अशी तांत्रिक वैशिष्ट्य असून पेट्रोलची कार प्रति लीटर २३.८४ किलोमीटर; तर डिझेलची कार प्रति लीटर २७.२८ किलोमीटर इतके मायलेज देत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

Leave a Comment