‘हाफ तिकीट’चे पोस्टर रिलिज

half-ticket
बच्चे कंपनीला केंद्रस्थानी ठेवून त्यांचे भावविश्व रेखाटणाऱ्या चित्रपटांची निर्मिती अलीकडच्या काळात मराठीत प्रकर्षाने होताना दिसत आहे. असाच एक वेगळा दृष्टीकोन देणारा चित्रपट निर्माते नानूभाई जयसिंघानी व दिग्दर्शक समित कक्कड घेऊन आले आहेत. ‘हाफ तिकीट’ या चित्रपटाचे आकर्षक पोस्टर नुकतेच रिलिज करण्यात आले आहे.

गेल्या काही वर्षात लहान मुलांवर आधारित अनेक चित्रपट येऊन गेले. त्या चित्रपटांनी चांगलीच लोकप्रियताही मिळवली. आता ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून आणखी एक वेगळा विषय बघायला मिळणार आहे. आजवर अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती व प्रस्तुती करणारे नानूभाई जयसिंघानी यांनी ‘हाफ तिकीट’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट रसिकांसाठी आणला आहे. चांगल्या विषयाच्या चित्रपटासाठी व्हिडीओ पॅलेसने नेहमीच पुढाकार घेतला आहे. ‘हाफ तिकीट’च्या निमित्ताने एक आशयघन विषय मांडला जाणार असल्याने व्हिडीओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा हाती घेतली आहे.

यापूर्वी ‘आयना का बायना’ या चित्रपटातून बालसुधारगृहातील लहान मुलाचे भावविश्व वेगळे विषय हाताळणारे दिग्दर्शक समित कक्कड यांनी रेखाटले होत. या चित्रपटाने १८व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करीत आपली मोहोर उमटवली होती. आता ‘हाफ तिकीट’च्या माध्यमातून पुन्हा एकदा लहान मुलांची अनोखी कहाणी ते मांडणार आहेत.