सुखाचे सात मूलमंत्र- खास महिला वर्गासाठी

laghuter
सुखाने, आनंदाने जीवन जगावे असे कुणाला वाटत नाही? मात्र सुख हे विकत मिळत नाही तसेच आनंदही विक्रीसाठी नसतो. तो आपणच मिळवावा लागतो. घरादारातील कामे, नोकरीची धावपळ, बालसंगोपन, वृध्दांची देखभाल, मुलांच्या परिक्षा, पाहुणे, अशा अनेक आघाड्यांवर लढणार्‍या महिलांना बरेचदा आनंद उपभोगणे कामाच्या रगाड्यापुढे आणि दैनंदिन अडचणींमुळे शक्य होत नाही. मग त्या वैतागतात, त्रागा करतात आणि पर्यायाने घरातील शांतता समाधान कुठेतरी हरवू लागते. तेव्हा सुखाचे हे सात मूलमंत्र आचरणात आणून पहा.

१) कोणताही विचार सकारात्मक दृष्टीकोनातून करा. जीवनात कांहीच अशक्य नाही. गरज असते पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करण्याची. अशा वेळी सकारात्मक विचार तुम्हाला वेगळाच आत्मविश्वास देतात आणि त्याचा तुमच्या आरोग्यावरही अनुकुल परिणाम होतो. परिणामी अधिक शक्तीनिशी तुम्ही कामाला सज्ज होऊ शकता.

२) भूतकाळातील घटना उगाळू नका- आयुष्य जगताना जुने जाऊद्या मरणालागूनी, तोडून अथवा मोडून टाका हा मंत्र लक्षात ठेवा. त्रासदायक जुन्या घटना पुन्हापुन्हा उगाळू नका तर वर्तमानाचा विचार करा. जुनेच उगाळत राहिलात तर वर्तमानातला आनंद लुटणे अवघड होते हे लक्षात ठेवा.

travel

३) आनंद मिळतो, तेथे आवर्जून जा- जेथे भेट दिल्याने जिवाला गारवा मिळतो, आनंद मिळतो व एकप्रकारची शांतता तनामनात भिनते अशा ठिकाणी आवर्जून भेट द्या. ज्या ठिकाणी तुमच्या दुःखाशी निगडीत स्मृती आहेत तेथे जाणे शक्यतो टाळा.

४)आवडते संगीत ऐका- बाहेर जाणे शक्य नाही आणि उदासी दाटून आलीय अशा वेळी किंवा बोअर होत असेल तर आवडती गाणी, संगीत ऐका. संगीतामुळे तणाव कमी होतो हे संशोधनातून सिद्ध झाले आहे.

५) हसतमुख रहा आणि दुसर्‍यांना हसण्याची संधी द्या – कुणालाही नाराज करायला एक मिनिटही पुरते मात्र हसवायला तासन तास वेळ जाऊ शकतो असे म्हटले जाते व ते पूर्ण खरेही आहे. तेव्हा आनंदी राहण्यासाठी स्वतः हसा, दुसर्‍यांनाही हसण्याची संधी द्या.

food

६)आहाराकडे लक्ष द्या- लक्षात ठेवा जे तुम्ही खाता, त्याचा परिणाम तुमचा चेहरा आणि शरीरावर उमटत असतो. तेव्हा खाण्याकडे लक्ष द्या, सीझनप्रमाणे मिळणार्‍या सर्व भाज्या, फळे आवर्जून खाच पण रोजचे ताटही रंगीबेरंगी असेल याची काळजी घ्या. यामुळे तुमचे शरीर फिट राहण्यास मदत मिळते आणि स्वास्थ मिळाले की आनंद त्यापाठोपाठ येतोच.

७)झोपेकडे दुर्लक्ष नको- डोक्यात सतत कांही ना कांही विचार चालू असले की झोपेचे खोबरे होते हा अनुभव सर्वांनाच असतो. मात्र झोपेच्या वेळी पूर्ण लक्ष झोपेकडेच केंद्रीत ठेवा. विचार करायला सगळा दिवस पडलाय असे मनाला समजवा आणि पुरेशी झोप व विश्रांती मिळेल यासाठी प्रयत्न करा. झोप आणि विश्रांती पुरेशी झाली की चेहरा आपोआपच फ्रेश होतो व प्रसन्न चेहरा म्हणजे एकप्रकारच्या सुखाची अनुभूतीच नांही का?

Leave a Comment