पनामा लिक्सचा धूर

panama-leaks
एका इंग्रजी दैनिकाने परदेशात बेकायदारित्या गुंतवणूक करणार्‍या जगभरातल्या काही श्रीमंतांची यादी प्रसिध्द करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारच्या खळबळजनक बातम्यांचे गम्य असतेच असे नाही. त्यातल्या त्यात गेल्या सात-आठ वर्षात परदेशात गेलेला काळा पैसा हा मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये या काळ्या पैशाचा विषय चर्चेला आणला होता. त्यामुळे मोदी पंतप्रधान झाले की हा काळा पैसा भराभर भारतात परत येणार आहे असा लोकांचा समज झाला होता. मात्र तसा तो आलेला नाही. त्यामुळे मोदींच्या विरोधकांनी या गोष्टीचा नेमका फायदा घ्यायला सुरूवात केली आहे. मोदींनी दिलेल्या आश्‍वासनानुसार काळा पैसा आणलेला नाही. म्हणजे त्यांनी आश्‍वासन मोडला आहे असा सोयीस्कर आरोप मोदी विरोधक करत आहेत. खुद्द मोदी, त्यांचे अर्थमंत्री अरुण जेटली आणि भाजपाचे काही नेते थोडे सबुरीने बोलत आहेत. काळा पैसा परत आणणे हे कायदेशीरदृष्ट्या गुंतागुुंतीचे काम आहे. त्यामुळे त्याला वेळ लागत आहे. प्रत्यक्षात हा पैसा सरकार कधी ना कधी आणणार आहे असे त्यांच्याकडून सूचित केले जात आहे.

अशाप्रकाच्या उलटसुलट चर्चांमुळे एखाद्या वृत्तपत्राने किंवा माध्यमाने काळ्या पैशाच्या संदर्भात कसलीही बातमी प्रसिध्द केली तर लोक तिच्या फार खोलात शिरत नाहीत आणि वरकरणी झालेल्या गौप्यस्फोटावरून काहीतरी समज करून घेतात. उदा. या इंग्रजी दैनिकाने दक्षिण अमेरिकेतल्या पनामा बेटावरील एका वादग्रस्त कंपनीने दिलेल्या माहितीवरून जगभरातल्या काही धनाढ्य लोकांची यादी प्रसिध्द केली आहे. या लोकांनी आपल्या देशातला काळा पैसा या पनामा बेटावरच्या या संस्थेच्या माध्यमातून बेकायदारित्या काही कंपन्यात गुंतवला असल्याचे या बातमीत म्हटले आहे. गेले ८ महिने काही पत्रकारांनी आणि शोध पत्रकारिता करणार्‍या बातमीदारांनी एकत्रित येऊन या प्रकल्पावर काम केले आणि लाखो कागदपत्रे उघड करून त्यातून परदेशात पैसा गुंतवणार्‍या विविध देशातल्या काही मातब्बरांची माहिती उघड केली आहे. या मातब्बर लोकांत भारतातील ५०० लोकांचा समावेश आहे. शिवाय पाकिस्तान, रशिया, अरबस्तान अशाही विविध देशातील धनाढ्यांचा त्यात समावेश आहे. पाकिस्तानचे विद्यमान पंतप्रधान नवाझ शरीफ आणि दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो हेही या अवैध गुंतवणूकदारात समाविष्ट असल्याचे या गौप्यस्फोटातून दिसून येते.

भारतातील ज्या लोकांची नावे या यादीमध्ये आहेत. त्यात अमिताभ बच्चन आहेत. त्यांची स्नूषा ऐश्‍वर्या रॉय हीही त्यात आहे. अशा प्रकरणात एकदा नाव येऊन गेले की माणूस बदनाम होऊन जातो. आरोपाच्या सत्य-असत्याची कोणी शहानिशा करत नाही. अमिताभ यांचे नाव गेल्या सात-आठ दिवसांपासून राष्ट्रपतीपदाचा संभाव्य उमेदवार म्हणून घेतले जायला लागले होते. परंतु पनामा लिक्समध्ये त्यांचे नाव आले आणि त्यांची बदनामी झाली. आता ही बदनामी खरी की खोटी हे कोणी जाणत नाही. परंतु जे कोणी लोक त्यांना राष्ट्रपती करायला आतूर झाले होते ते आता त्यांचे नाव पुढे करण्याची जोखीम पत्करणार नाहीत आणि हात भाजून घेणार नाहीत. एकंदरीत बीग बीची राष्ट्रपती पदाची संधी धोक्यात आली आहे. पनामा लिक्समध्ये नाव येणे यामध्ये नेमके बेकायदा काय आहे आणि लोकांनी केलेली या देशातली गुंतवणूक हा किती मोठा गंभीर अपराध आहे याचे तर्कशुध्द विश्‍लेषण अजून झालेले नाही. एकुणात हा काहीतरी अपराध आहे हे उघड झाले आहे. तो किती गंभीर अपराध आहे हे हळूहळू उघड होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या आदेशानुसार चौकशी होईल तेव्हाच ही सारी प्रतिष्ठित मंडळी किती वर्षांसाठी खडी फोडायला जाणार हे ठरणार आहे.

तूर्तास तरी या लोकांनी पनामा बेटावरील वादग्रस्त संस्थेच्या माध्यमातून परदेशात पैसा गुंतवलेला आहे. त्यातला अपराध असा की भारतात त्या काळामध्ये परदेशी पैसा गुंतवण्यास अनुमती नव्हती. ज्या काळात ही अनुमती नव्हती त्या काळात या लोकांनी गुपचुप आपले पैसे परदेशात नेले आहे आणि तिथे गुंतवले आहेत. २००४ पासून या लोकांना परदेशात २५ हजार डॉलर्स नेऊन तिथे जाऊन निरनिराळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्याची अनुमती मिळाली होती. परंतु त्या आधीच त्यांनी हे उद्योग केल्यामुळे ते आरोपी ठरले आहेत. आता सरकार अशी परदेशी गुंतवणूक करायला उलट प्रोत्साहन देते पण एक काळ असा होता की हीच गुंतवणूक बेकायदा होती. एकंदरीत ही गुंतवणूक चांगली की वाईट याचा निर्णय न्यायालय करत नसते. मात्र ज्या काळात ती झाली त्या काळातला कायदा काय म्हणतो हेच न्यायालये बघत असतात. त्यामुळे हा पैसा गुंतवणारे लोक अडचणीत आले आहेत. हे खरे आहे. परंतु ऐश्‍वर्या रॉय-बच्चन यांनी हे सगळे आरोप उडवून लावले आहेत आणि या बातम्या खोट्या असल्याचे म्हटले आहे. एकंदरीत या वृत्तपत्राने म्हटले म्हणून हे लोक चोर ठरणार नाहीत. त्यांची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.

Leave a Comment