दोन कोटी पौंडात मिळवा अख्ख्या गावाची मालकी

gaon
ठिकठिकाणी घरे, दुकाने वा तत्सम वास्तू विक्रीला असणे यात विशेष ते काय? मात्र ब्रिटनमध्ये एक अख्खे गावच विक्रीसाठी उपलब्ध करून दिले गेले आहे. नॉर्थ यार्कशायरच्या माल्टन जवळ वेस्ट हेसलर्टन हे गांव दोन कोटी पौंड म्हणजे १८९ कोटी रूपयांत मिळू शकणार आहे.

या गावात २१ बेडरूम्स असलेली हवेली, पब, पेट्रोल पंप, ४३ घरे २११६ एकर मोकळी जमीन शिवाय चर्च, शाळा, खेळाचे मैदान आहे. गेली १५० वर्षे या गावाची मालकी एकाच परिवाराकडे होती. पाच वर्षापूर्वी या गावाची मालकीण इव्ह डॉवने हिचा मृत्यू झाला व त्यानंतर तिच्या कुटुंबाने हे गाव विकण्याचा निर्णय घेतला. इस्टेट एजंटनी दिलेल्या माहितीनुसार हे गांव खरेदी करण्यासाठी अनेकांनी रस दाखविला आहे.

येथील अन्य रहिवासी सांगतात गावाची मालकीण इव्ह खूपच दयाळू होती. तिने येथील घरे भाड्याने देताना खूपच कमी भाड्यात दिली होती त्यामुळे विविध वयोगटातील लोक येथे सुखासमाधानाने राहात होते. येथील रहिवाशांचे हे आवडते गांव आहे. त्यांना हे गाव विकले जाणार असल्याची कल्पना दिली गेली आहे. नवीन मालक ही इव्हसारखाच दयाळू असावा अशी रहिवाशांची इच्छा आहे. पृथ्वीच्या पाठीवर असे दुसरे गांव मिळणार नाही असेही येथील रहिवासी सांगतात.

Leave a Comment