सकस अन्नाची पंचसूत्री

indian-food
आपला आहार कसा असावा याबाबत अनेक प्रकारचे सल्ले दिले जातात. या सल्ल्यामध्ये आता वरचेवर वाढ होत चालली आहे आणि त्यांचे निकषही बदलत आहेत. पूर्वी सकस अन्नाची शिफारस करताना त्यात प्रथिने असावीत, जीवनसत्त्वे असावीत एवढेच मर्यादित स्वरूपात मार्गदर्शन केले जात होते. परंतु आता हे मार्गदर्शन अधिक सखोल आणि व्यापक होत चालले आहे. खालील शिफारशींवरून या बदलत्या स्वरूपाची कल्पना येऊ शकते.

१. गव्हांकूर – गव्हांकूर हे मर्यादित स्वरूपात खाल्ले जात असले तरी ते थियामीन या द्रव्याचा मोठा स्रोत आहे. त्याशिवाय फोलेट, मॅग्निशियम, फॉस्फरस, झिंक यांचाही पुरवठा गव्हांकुरातून चांगला होतो. प्रथिने, तंतुमय पदार्थ आणि काही प्रमाणात स्निग्ध पदार्थ यांचाही पुरवठा ते करते. मोड आलेले गहू कोणतीही डिश खाताना वर थोडे शिंपडले तरी ते आरोग्याला उपकारक ठरते.

२. राताळू – हे तसे उपवासाला खाल्ला जाणारा अन्नपदार्थ असला तरी त्यामध्ये बीटा कॅरोटीन आणि काही कर्करोग प्रतिबंधक द्रव्ये असतात. शरीराची वृध्दत्त्वाकडे होणारी वाटचाल राताळूच्या खाण्याने रोखली जाऊ शकते. राताळूमधून अ आणि क जीवनसत्त्व मिळते. फायबर, व्हिटॅमीन बी ६ आणि पोटॅशियम यांचाही पुरवठा राताळूमधून चांगला होतो. राताळू हे चरबीपासून दूर ठेवतात.

३. पालक – अ आणि क जीवनसत्त्व, फोलेट त्याचबरोबर मॅग्नेशियम यांचा मोठा स्रोत असलेली पालकाची भाजी कॅरोटिनाईड्स आणि बीटा कॅरोटीन यांचा मोठा स्रोत असते. वृध्दत्त्वामुळे येणारे आजार पालकाची भाजी खाल्ल्याने टळतात. रातांधळेपणा आणि हृदयविकार यांचा प्रतिकार पालकामुळे होतो.

४. बीन्स – डबल बीन्स किंवा श्रावण घेवडा हाच आपल्या माहीत असतो. परंतु वालाच्या अनेक प्रकारच्या शेंगा असून त्या लोहाचा मोठा पुरवठा करू शकत असतात. फॉस्फरस आणि पोटॅशियम हे तर त्यांचे वैशिष्ट्यच. रेड बीन्स म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजीमुळे तर रोग प्रतिकारशक्ती वाढते.

५. बदाम – अनेक पोषक द्रव्यांचा आगार असलेले बदाम रिबोफ्लेविन आणि मॅग्नेशियम यांचा पुरवठा करतात. हृदयविकारावर प्रतिबंधक म्हणून बदाम खाणे चांगले.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment