मंगळावरील पर्वत तयार होण्यात वा-यांचाही मोठा हातभार

mars
वॉशिंग्टन : वेगाने वाहणा-या वा-यांमुळे मंगळावरील काही मैल उंचीचे पर्वत हे अब्जावधी वर्षांपूर्वी तयार झाले असल्याचे एका नवीन अभ्यासात दिसून आले आहे. मंगळावरील वातावरणात पाणी नष्ट करणारे बदल कसे घडत गेले याबाबतचे हे संशोधन आहे. टेक्सास विद्यापीठातील ऑस्टिन जॅकसन स्कूल ऑफ जिओसायन्सेस या संस्थेच्या श्रीमती मॅकेन्झी डे यांनी केलेल्या संशोधनात असे दिसून आले, की मंगळावरील पृष्ठभूमीवरील डोंगर द-या यांच्या निर्मितीत वा-याचे मोठे महत्त्व होते.

पृथ्वीसारख्या टेक्टॉनिकचा मंगळावर संबंध नाही. तेथे पाणी नाही पण तरीही तेथे मोठे पर्वत तयार होऊ शकले, त्यातून वा-यांनी तेथील भूपृष्ठाच्या रचनेत मोठी भूमिका पार पाडली आहे. पृथ्वीवर वा-यामुळे असे घडत नाही कारण पाणी फार वेगाने काम करीत असते, टेक्टॉनिकचा मोठा परिणाम असतो. त्यांनी सांगितले की, नासाच्या १९७० मधील व्हायकिंग या पहिल्या यानामुळे तेथील विवरात पर्वत असल्याचे दिसून आले. अलीकडच्या विश्लेषणानुसार क्युरिऑसिटी गाडीने माऊंट शार्प हा गेल विवरातील तीन मैल उंचीचा पर्वत शोधला आहे. यातील काही पर्वत हे खडकांचे बनले आहेत. पाण्याबरोबर विवरांमध्ये गाळ वाहत आला, त्यातून पर्वत बनले पण या पर्वतांचा वरचा भाग वा-यामुळे तयार झाला आहे. वा-याने केलेल्या क्षरणामुळे हे पर्वत तयार झाले व ते अब्जावधी वर्षांपूवी बनले असे सांगितले जाते. पण वा-यामुळे ते नेमके कसे तयार झाले यावर आमचे संशोधन आधारित आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, त्यासाठी ४ सेंटीमीटर खोलीचे व ३० सेंटीमीटर व्यासाचे विवर तयार करून त्यात वाळू भरण्यात आली व ते वा-याच्या झोतात ठेवण्यात आले, तेव्हा वाळूची रचना वेगळी दिसली. मंगळावरील विवरात अशीच क्रिया घडून पर्वत तयार झाले. वायुगतिकी समजण्यासाठी यात संगणकसदृश करणाचा वापर करण्यात आला व त्यातून वा-यामुळे पृष्ठभागाचे क्षरण होऊन पर्वत कसे बनले असावेत हे दाखवण्यात आले.

मंगळावर पाणी असताना या पर्वतांचा पाया तयार झाला, पण त्यांचा वरचा भाग पाणी नसताना बनला असावा. मंगळावरील ३.७ अब्ज वर्षांपूर्वीच्या नोआशियन काळाचा वेध यात घेतला असून त्या वेळी मंगळ ओल्याचा कोरडा व्हायला सुरुवात झाली होती. तेथील तीस पर्वतांचे निरीक्षण करून वैज्ञानिकांनी हवामानातील बदलांचा त्यांच्या निर्मितीशी संबंध लावला आहे. हे संशोधन जिओफिजिकल रीसर्च लेटर्स या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Leave a Comment